जम्मू-काश्मीरमध्ये फिरायला आलेल्या निष्पाप पर्यटकांना दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये लक्ष्य करत त्यांना ठार मारलं. 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा हकनाक बळी गेला. त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर मिसाईल्स डागत 100 दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र या कारवाईनंतर दोन्ही देशांमधील तणाव प्रचंड वाढला असून पाकिस्तानच्या कुरापती अद्याप कायम आहेत. पाकिस्ताने भारतातील अनेक शहरांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ला करण्याचा प्रय्तन केला. मात्र भारताच्या कुशल एअर डिफेन्स सिस्टीमने तो हाणून पाडला.
दोन्ही देशांतील सध्याच्या स्थितीवर संपूर्ण जगाचं लक्ष आहे. याचदरम्यान अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हेन्स यांची महत्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे. भारत-पाकिस्तान प्रकरणात अमेरिका दखल देणार नाही, आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
अमेरिका हा भारत-पाकला शस्त्र टाकण्यास सांगू शकत नाही, ते आमचं काम नाही,अमेरिकेचं त्याच्याशी काही घेणंदेणं नाही, असं जेडी व्हेन्स म्हणाले. हा संघर्ष असा आहे की, ज्यामध्ये अमेरिकेचा थेट संबंध नाही. अमेरिका ही परिस्थिती नियंत्रित करण्याच्या स्थितीत नाही आणि अमेरिकेचा या संघर्षाशी काहीही संबंध नाही असे म्हणत युद्धाच्या मध्ये अमेरिका पडणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला. आम्ही राजनैतिक मार्गांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहोत, असे व्हेन्स म्हणाले.
आण्विक संघर्षात रुपांतर होऊ नये ही आशा
आम्हाला दोन्ही देशांमधील सुरू असलेला तणाव लवकरात लवकर कमी करायचा आहे. आम्ही युद्धामध्ये अडकणार नाही, आमचा त्यात काही संबंध नाही, असे व्हेन्स म्हणाले. हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मामला आहे.मात्र हे एका व्यापक प्रादेशिक युद्धात किंवा आण्विक संघर्षात रूपांतरित होणार नाही अशी आम्हाला आशा आहे. अणुऊर्जाधारित देशांमधील तणावाबद्दल आपल्याला नेहमीच काळजी वाटते, असेही व्हेन्स यांनी नमूद केलं.
आम्ही भारत-पाकिस्तानला कंट्रोल करू शकत नाही
अमेरिका या देशांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, आम्ही फक्त त्यांना तणाव कमी करण्यास सांगू शकतो, असे अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी सांगितले. अमेरिका ही भारत किंवा पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही. पण राजनैतिक पद्धतीने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. या तणावाचे रूपांतर मोठ्या प्रादेशिक युद्धात होणार नाही आणि त्यामुळे अणुयुद्ध होणार नाही, अशी आशा आहे. अमेरिकेला हा वाद लवकरात लवकर सोडवायचा आहे. प्रादेशिक स्थिरता केवळ दक्षिण आशियासाठीच नाही तर जागतिक शांततेसाठी देखील महत्त्वाची आहे, परंतु त्याचे निराकरण स्थानिक पातळीवरच शोधले पाहिजे, असेही व्हेन्स म्हणाले.
भारताचं पाकला चोख प्रत्युत्तर
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 6-7 मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली. भारतीय सुरक्षा दलांनी पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करून ते उद्ध्वस्त केले. भारताने जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवादी तळांवर हल्ला केला. या कारवाईनंतर पाकिस्तान घाबरला आहे. गुरुवारी, पाकने पंजाब, जम्मू, राजस्थान, उधमपूरसह देशातील अनेक लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने तो यशस्वीरित्या हाणून पाडला. यामुळे दोन्ही देशांतील तणाव अतिशय वाढला आहे.