आरे-वरळी गारेगार प्रवास
मेट्रो-३च्या टप्पा दोनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो मार्गावर आरे-आचार्य अत्रे चौकापर्यंतचा (वरळी) सुमारे २३ किलोमीटरचा गारेगार प्रवास आता मुंबईकरांना अवघ्या ६० रुपयांत करता येणार आहे. मेट्रो-३च्या बहुप्रतीक्षित टप्पा दोनचे शुक्रवारी (ता. ९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ही मेट्रो सेवा उद्या शनिवारी सकाळी साडेसहा वाजल्यापासून प्रवाशांच्या सेवेत येईल. त्यामुळे दररोज लोकल, बेस्टने घामाघूम होऊन प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) सुमारे ३३ किलोमीटर लांबीच्या आरे-नरिमन पॉइंट या भूमिगत मेट्रो मार्गाचे काम करीत आहे. त्यापैकी आरे-बीकेसी हा पहिला टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झाला असून शुक्रवारी टप्पा दोनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यामुळे आरे, मरोळ, सांताक्रुझ, बीकेसी, वरळी, दादर, प्रभादेवी, माहीम नागरिकांना गारेगार प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. तसेच या परिसरात होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. या मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ‘एमएमआरसीएल’च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, मेट्रो-३चा तिसरा अंतिम टप्पा आचार्य अत्रे चौक ते कफ परेड हा टप्पा ऑगस्टमध्ये सुरू केला जाणार आहे. या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
१०० किमीची मेट्रो सेवेत येणार
मुंबईतील सर्वात लांब आणि गुंतागुंतीचा मेट्रो मार्ग म्हणून आरे-कफ परेड ही मेट्रो मार्गिका उभारली जात आहे. २०१७ मध्ये या मेट्रोचे काम सुरू झाले. ‘एमएमआरसीएल’ने विक्रमी वेळेत हे काम केले आहे, तसेच पुढील दोन वर्षांत दोन टप्प्यांत १०० किलोमीटरचे मेट्रो मार्ग सेवेत आणणार असल्याची ग्वाही या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सिंगल तिकीट प्लॅटफॉर्म
मुंबईकरांना एकाच तिकिटावर मेट्रो, मोनो, लोकल ट्रेन आणि बेस्टचा प्रवास एकाच तिकिटावर करता यावा, म्हणून सिंगल तिकीट प्लॅटफॉर्म प्रणाली लवकरच आणली जाणार आहे. त्याबाबतच्या चाचण्या सुरू असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
तिकीट दर
- किमान तिकीट - १० रुपये
- आरे जेव्हीएलआर - आचार्य अत्रे चौक (वरळी) - ६० रुपये
- आरे - बीकेसी - ५० रुपये
- बीकेसी - आचार्य अत्रे चौक - ४० रुपये
- रिटर्न तिकीट - सध्याच्या तिकिटाच्या दुप्पट असणार
टप्पा दोनची वैशिष्ट्ये
- लांबी - ९. ७७ किमी
- स्थानक - ६ (भूमिगत)
- गाड्यांची संख्या - ८ असतील (पहिल्या टप्प्यात १० धावत आहेत)
- प्रवासाची वेळ - १५ मिनिटे
सहा स्थानकांचा समावेश
भुयारी मेट्रो मार्गावर एकूण २७ स्थानके असून पहिल्या टप्प्यात आरे-बीकेसीदरम्यानची १० स्थानके सेवेत आली आहेत. दुसऱ्या टप्प्यात (२-ए) बीकेसी-आचार्य अत्रे चौकदरम्यान सहा स्थानके आहेत.
- धारावी
- शीतलादेवी
- दादर
- सिद्धिविनायक मंदिर
- वरळी
- आचार्य अत्रे चौक
..
खर्च ३७ हजार कोटींवर
आरे-कप परेड या मेट्रो-३ या प्रकल्पाचा २०११मध्ये ‘डीपीआर’नुसार २३ हजार ९०० कोटी रुपये एवढा खर्च होता; मात्र वेळोवेळी मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वारांमध्ये करावा लागलेला बदल आणि विलंबामुळे खर्चात जवळपास साडेतेरा हजार कोटी रुपये एवढी मोठी वाढ होऊन हा खर्च तब्बल ३७ हजार २७६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.