पुणे, ता. ९ : वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लाकडांसह भुशापासून तयार केलेल्या विटांचा (बायोमास ब्रीकेट्स) वापर केला जात आहे. त्यामुळे हवा प्रदूषण कमी होत आहे, सोबतच लाकडाचा वापर कमी होत असल्याने पर्यावरण रक्षणास हातभार लावण्यास मदत होत आहे.
वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी विद्युत दाहिनी, गॅस दाहिनी, डिझेल दाहिनी आहे. त्याचप्रमाणे लाकडाचाही वापर केला जातो. पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी लाकडाचा वापर करू नये, यासाठी विद्युत, गॅस व डिझेल दाहिनीमधील अंत्यसंस्कार मोफत केले जातात. लाकडावरील अंत्यसंस्कार करताना त्याचा खर्च नागरिकांना करावा लागतो. असे असले तरीही परंपरेनुसार अनेकजण लाकडावरच अंत्यसंस्कार करण्यासाठी प्राधान्य देतात.
लाकडाच्या वापरामुळे वृक्षतोड होते तसेच धुराचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे त्यास पर्याय म्हणून शेतातील पाचट, शेंगांची टरफले याच्या भुशापासून तयार केलेल्या विटांचा वापर करण्याचा पर्याय समोर आला. त्यानुसार महापालिकेने प्रेस्पल या कंपनीने तयार केलेल्या विटा वैकुंठ स्मशानभूमीत विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. अंत्यसंस्कार करताना ६० टक्के लाकडे आणि ४० टक्के भुशाच्या विटा असे प्रमाण घेऊन काही नागरिक अंत्यसंस्कार करण्यास तयार होत आहेत. पावसाळ्यात लाकडे भिजलेली असतात, तेव्हा या विटांचा वापर करणे अधिक योग्य ठरत आहे. या अभिनव पर्यावरणपूरक पद्धतीने आतापर्यंत एक हजारपेक्षा अधिक अंत्यविधी पार पडले आहेत. प्रेस्पल कंपनीचे मोनिश आहुजा, सुमीत मल्हान, अनुराग वर्मा, प्रकाश झा, संदीप प्रजापती यांच्याकडून या विटांचा वापर वाढावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
महापालिकेच्या मुख्य अभियंता मनीषा शेकटकर म्हणाल्या, ‘‘अंत्यविधी करताना प्रदूषण कमी व्हावे, लाकडाचा वापर कमी व्हावा, यासाठी भुशापासून बनविण्यात आलेल्या विटांचा वापर केला जातो. त्यास नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरण रक्षणासाठी विटांचा वापर वाढवावा.’’
याठिकाणी होतोय वापर
पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी तसेच अमरधाम (हडपसर), मुक्तिधाम (पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड), कात्रज, सासवड आणि उरुळी कांचन येथील स्मशानभूमीमध्ये या विटांचा वापर केला जात आहे.
विटांमुळे होणारा फायदा
- भुशाच्या विटेमुळे झाडे तोडण्याची गरज भासत नाही
- कार्बनचे उत्सर्जन कमी होते
- शेतकऱ्यांना शेतीतील टाकाऊ अवशेषांपासून उत्पन्न मिळते. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना मिळते
- लाकडाच्या तुलनेत भुशाच्या विटा अधिक उष्णता निर्माण करतात