पिंपरी, ता. ९ : सभासदत्व देणे, संस्थांच्या तक्रारी, लेखापरीक्षण आदींसह विविध विषयांच्या ८० तक्रारी उपनिबंधक सहकारी संस्था सहा कार्यालयांतर्गत दर महिन्याकाठी प्राप्त होत आहेत. या तक्रारींसाठी आठवड्यातून दोन दिवस सुनावणी घेतली जात आहे. या सुनावणीतून येणाऱ्या तक्रारी सोडविण्यास प्राधान्य देत आहे, अशी माहिती अधिकारी देत आहेत.
उपनिबंधक सहकारी संस्था सहा अंतर्गत तीन हजार २२४ संस्थांची नोंदणी झाली आहे. उपनिबंधक हे अर्धन्यायिक पद आहे. त्यामुळे या कार्यालयांतर्गत येणाऱ्या संस्थांशी संबंधित अनेक तक्रारी या कार्यालयात प्राप्त होतात. यामध्ये सहकारी संस्थांच्या थकबाकी वसुलीसाठी वसुली प्रमाणपत्र मिळविण्याबाबत सुनावणी होते. तसेच अनेकांना नवीन सभासदत्व दिले जात नाही. सभासदत्व मिळविण्यासाठी तक्रारी प्राप्त होतात. संचालक मंडळ बरखास्तीचे विषय, संस्थांबाबत वैयक्तीक तक्रारी आदींचा समावेश होतो. या वाढत्या तक्रारींवर मार्ग काढण्यासाठी उपनिबंधक सहकारी संस्थांच्या वतीने सुनावणी घेतली जात आहे.
दर बुधवारी आणि गुरुवारी उपनिबंधक सहकारी संस्थांच्या कार्यालयात सुनावणी आयोजित केली जात आहे. यामध्ये तक्रारदार आणि ज्याच्या विरोधात तक्रारी आहेत, त्यांना बोलावले जाते. दोघांची बाजू ऐकून मार्ग काढला जातो. दर आठवड्याला या कार्यालयांतर्गत २० तक्रारी प्राप्त होत आहेत. महिन्याकाठी ८० तक्रारींवर सुनावणी होत आहे. नागरिकांनी काही तक्रारी असतील तर संपर्क साधण्याचे आवाहन कार्यालयाच्या वतीने केले आहे.
‘‘अर्ध न्यायिक पद असल्याने दर आठवड्याला दोन दिवस सुनावणी घेतली जात आहे. आठवड्याला २० तक्रारी प्राप्त होत आहेत. दोन्ही बाजू ऐकल्या जात आहेत. त्यानुसार सुनावणी केली जात आहे.
- मुकुंद पवार, उपनिबंधक, सहकारी संस्था (६) पुणे.