India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणावाची स्थिती आहे. कोणत्याही क्षणी या दोन्ही देशांत युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही देश एकमेकांवर रॉकेट हल्ले, क्षेपणास्त्र डागत आहेत. असे असताना आता जगातील महाशक्ती असलेल्या जी-7 देशांनी एकत्र येत भारत-पाक तणावावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जी-7 देशांनी दोन्ही देशांना चर्चेतून प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले आहे.
जी-7 देशांनी भारत आणि पाकिस्तान यांनी एकमेकांशी थेटपणे चर्चे करावी, असा आग्रह केला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शत्रूत्त्व आणखी वाढत चालले आहे. असे असतानाच जी-7 देशांनी ही भूमिका घेतली आहे.
जी-7 देशांत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन अमेरिका आणि युरोपीयन संघांच्या परराष्ट्र मंत्री तसेच उच्च प्रतिनीधींनी दोन्ही देशांनी त्यांच्यातील तणाव कमी करावा असे आवाहन केले आहे. शनिवारी जी-7 राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तानला आवाहन करण्यात आले आहे.
‘आम्ही कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका हे जी-7 देशांचे परराष्ट्रमंत्र तसेच युरोपीयन संघाचे उच्च प्रतिनिधी 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. आम्ही भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयम बाळगावा असा आग्रह करतो. लष्करी कारवाईमुळे मोठा आणि गंभीर धोका निर्माण होऊ शकतो,’ असं जी-7 देशांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
‘आम्ही दोन्ही देशांतील नागरिकांच्या सुरक्षेची आम्हाला चिंता आहे. हा तणाव कमी करण्याचे आम्ही आवाहन करतो. तसेच शांतीसाठी थेट चर्चेत सहभागी होण्यासाठी आम्ही या देशांना प्रोत्साहित करतो आहोत. या दोन्ही देशात चालू असलेल्या घडामोडींवर आमचे बारिक लक्ष आहे. तत्काळ आणि कायमस्वरुपी राजकीय तोडगा काढण्याचे आम्ही समर्थन करतो,’ अशी भूमिकाही जी-7 देशांनी घेतली आहे.
दरम्यान, 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. पहलगाम हल्ल्याचे उत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. या मोहिमेअंतर्गत भारताने पाकव्याप्त काश्मीर तसेच पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून टाकले. त्यानंतर शुक्रवारच्या रात्री म्हणजेच 9 मे रोजी पाकिस्तानने भारताच्या सीमाभागातील राज्यांत हल्ले केले. राजस्थान, जम्मू, पंजाब यासारख्या राज्यांना पाकिस्तानने लक्ष्य केलं आहे. त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणले आहेत.