‘पक्षात पुढच्या पिढीला जबाबदारी दिली पाहिजे, त्यातूनच खासदार शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. सुप्रियाताई या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार )पक्षाच्या कार्याध्यक्षा आहेत.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रीकरणाबाबत त्या पक्षाच्या आमदारांशी चर्चा करतील. चर्चेत काय निर्णय होईल हे ज्या त्या वेळी पाहिले जाईल’’, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमासाठी ते आज साताऱ्यात आले होते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटायला नको, या शरद पवार यांच्या वक्तव्याबाबत रोहित पवार म्हणाले, ‘कार्यकर्त्यांची कामे झाली पाहिजेत.
ही कामे करण्यासाठी सत्तेत गेले पाहिजे, अशी चर्चा आमदारांकडून झाली असावी. त्यातूनच शरद पवार यांनी मुलाखतीत असे बोलले असावेत. शरद पवार ज्यावेळी यासंदर्भाने बैठक बोलावतील, त्या वेळी त्यांच्यापुढे मत मांडेन. राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रक्रियेत मी नाही.’