12th Exam Results : बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीने ओढणीने गळफास घेऊन संपवले जीवन; ती दोन दिवसांपासून होती निराश
esakal May 10, 2025 03:45 PM

धामोड : कोनोली तर्फ असंडोली पैकी कुपलेवाडी (ता. राधानगरी) येथील साधना पांडुरंग टिंगे (वय १८) हिने बारावीच्या परीक्षेत (12th Exam Results) कमी गुण मिळाल्याने नैराश्यातून घरातील तुळईला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी (ता. ८) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद दगडू टिंगे यांनी राधानगरी (Radhanagari Police) दिली आहे.

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, साधना ही पनोरे (ता. पन्हाळा) येथील एका कॉलेजमध्ये बारावी सायन्सच्या वर्गात शिकत होती. नुकताच बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये तिला ४८ टक्के गुण मिळाले. कमी गुण मिळाल्याने दोन दिवसांपासून ती निराश होती.

गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घरात कोणी नसल्याचे पाहून तिने घरातील तुळईला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी तीन वाजता ही घटना उघडकीस आली. काल रात्री उशिरा या घटनेची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झाली. तिच्या मागे आई, वडील, भाऊ, आजी, आजोबा असा परिवार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.