Virat Kohli Retirement : विराटला निवृत्तीपासून रोखण्यामागे बीसीसीआयचा हेतू काय?
GH News May 10, 2025 10:07 PM

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करुन अवघे काही तास झाले आहेत. अशात रोहितनंतर आता अनुभवी फलंदाज विराट कोहली हा देखील टेस्ट क्रिकेटमधून रिटायर होणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. विराटच्या या निवृत्तीच्या चर्चेमुळे क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. विराट स्वत:हून या निर्णयावर पोहचलाय की त्यामागे दुसरं काही कारण आहे? अशी चर्चाही आता पाहायला मिळत आहे. मात्र विराटने तसा निर्णय घेतला तर तो भारतीय क्रिकेटसाठी मोठा झटका असेल. त्यामुळे विराटने त्याच्या या निर्णयावर फेरविचार करावा, असं बीसीसीआयने त्याला म्हटल्याचा दावा करण्यात येत आहे.

टीम इंडियाला अवघ्या काही दिवसानंतर इंग्लंड दौऱ्यावर जायचं आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्याआधीच रोहितने निवृत्ती घेतलीय. त्यात विराटने साथ सोडण्याचा निर्णय घेतला तर भारतासाठी मोठा झटका असेल. कारण सध्या घडीला संघात विराट आणि रवींद्र जडेजा या दोघांचा अपवाद वगळला तर फार अनुभवी खेळाडू नाहीत. त्यामुळे जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या दोघांवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रोहित शर्मा याच्याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऑलराउंडर आर अश्विन याने बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेदरम्यान तडकाफडकी निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. तसेच चेतेश्वर पुजारा ही अजिंक्य रहाणे दिग्गज जोडी गेल्या अनेक वर्षांपासून कसोटी संघातून बाहेर आहे. त्यामुळे विराटने निवृत्ती घेतली तर युवा खेळाडूंवर मार्गदर्शन आणि इतर गोष्टींबाबत त्याचे परिणाम पाहायला मिळू शकतात. त्यामुळे विराट इंग्लंड दौऱ्यासाठी असायला हवा, अशी चाहत्यांची इच्छा आहे.

विराटची इंग्लंडमधील कामगिरी

विराटने इंग्लंडमध्ये आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विराटने इंग्लंडमध्ये खेळलेल्या 17 सामन्यांमध्ये 1 हजार 96 धावा केल्या आहेत. विराट इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज आहे. भारताकडून इंग्लंडमध्ये कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानी आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी राहुल द्रविड आणि सुनील गावसकर विराजमान आहेत. विराटने 2018 साली इंग्लंड दौऱ्यावर 593 धावा केल्या होत्या.

तसेच विराट इंग्लंडमध्ये तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज आहे. विराटने टेस्ट, वनडे आणि टी 20I क्रिकेटमध्ये एकूण 2 हजार 637 धावा केल्या आहेत. राहुल द्रविड या यादीत पहिल्या स्थानी आहे. त्यामुळे विराटने निवृत्ती घेतल्यास इंग्लंड दौऱ्यात युवा खेळाडूंवर दबाव वाढेल. त्यामुळे विराटने निवृत्ती निर्णय न घेता टीम इंडियासह रहावं,अशी इच्छा बीसीसीआयची आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.