भारत-पाकिस्तान यांच्यात गेल्या 3 दिवसांपासून तणावाची स्थिती पाहायला मिळत होती. युद्धभूमीवर दोन्ही देशांकडून हल्ले-प्रतिहल्ले करण्यात येत होते. भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूरद्वारे घेतला. मात्र त्यांतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्यात आलं. मात्र आता दोन्ही देशाच्या सहमतीने अखेर युद्धविराम जाहीर झाला आहे. त्यामुळे आता भारतात स्थगित करण्यात आलेल्या स्पर्धांचं पुन्हा एकदा आयोजन करण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) उर्वरित 16 सामन्यांना केव्हापासून सुरुवात होणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. बीसीसीआयने भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीनंतर 9 मे रोजी 18 वा हंगाम आठवड्याभरासाठी स्थगित करण्यात येत असल्याचं जाहीर केलं होतं.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताने 7 मे रोजी मध्यरात्री पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांची 9 तळं उद्धवस्त केली. पाकिस्तानने त्यानंतर भारताला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला. भारतात त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने ब्लॅकआऊट करण्यात आलं. त्याचा परिणाम क्रिकेटवरही पाहायला मिळाला. सुरक्षेच्या दृष्टीने पंजाब किंग्स-दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात धरमशाळा येथे 8 मे रोजी आयोजित करण्यात आलेला सामना रद्द करण्यात आला. तर दुसऱ्याच दिवशी 9 मे रोजी उर्वरित हंगाम आठवड्याभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानंतर आयपीएल 2025 मधील उर्वरित सामन्यांबाबत बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी माहिती दिली होती. “सर्व स्थिती पाहून आणि संबंधितांसह चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल, असं शुक्ला यांनी म्हटलं होतं. आता दोन्ही देशांच्या संमतीने युद्धविराम जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे बीसीसीआय उर्वरित 16 सामन्यांसाठी सुधारित वेळापत्रक केव्हा जाहीर करणार? याची क्रिकेट चाहत्यांना उत्सूकता आहे.