तळेगाव स्टेशन, ता. १० : साडेतीन वर्षांपूर्वी वराळे (ता. मावळ) येथे झालेल्या केटरिंग कामगाराच्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला जन्मठेपेसह पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. पिंटू रामतेनु मंडल (वय २२, रामनगर, ता. कालियाचक, जि. मालदार, पश्चिम बंगाल) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपीने केटरिंग कामगार अशोक कुमार (वय ३५, कर्नाटक) याचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला होता. याप्रकरणी ३ सप्टेंबर २०२१ रोजी अविष्कार नवनाथ चौगुले (वय २२, वराळे, मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून आरोपी पिंटू मंडल याच्यावर खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी वडगाव मावळ जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती. वडगाव मावळ न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जे. एल. गांधी यांनी बुधवारी (ता. ७) याप्रकरणी निकाल दिला. या खटल्यात न्यायालयासमोर एकूण आठ जणांची साक्ष आणि इतर पुरावे नोंदवून सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता स्मिता चौगले यांनी प्रभावीपणे युक्तिवाद केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार आरती जाधव यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातर्फे या खटल्यासंदर्भात पाठपुरावा केला.
---