Thane News : सुट्टीवर असलेल्यांनी पुन्हा कर्तव्यावर रुजू व्हावे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे; युद्धजन्य परिस्थितीत जिल्हा प्रशासन सज्ज!
esakal May 11, 2025 01:45 AM

ठाणे : सर्वांना रजेवरून पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले असून, आता ही आपल्या सर्वांच्या 'परीक्षेची वेळ' आहे, त्यामुळे प्रत्येकाने सर्व प्रकारे सज्ज राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे यांनी दिले. जिलाधिकारी शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी प्रशासनातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

सुरक्षित निवारागृहांची निवड करून ती सर्व सोयीसुविधांनी सज्ज ठेवण्याचे तसेच नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्याचे निर्देश दिले. यासोबतच सायरनची नियमित तपासणी करणे, जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणे निश्चित करून त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची तातडीने पाहणी करणे यावर त्यांनी विशेष भर दिला. आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात सामाजिक संस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेता, त्यांच्याशी संबंधित माहिती अद्ययावत ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले. जीवनावश्यक वस्तू व साहित्याची यादी तयार करून पुरवठादारांची माहिती अद्ययावत ठेवण्यासोबतच, आपल्या विभागाशी संबंधित सर्व माहिती तातडीने अद्ययावत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शिनगारे यांनी केले. तसेच "आता प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची वेळ आहे.

देशासाठी आणि समाजासाठी एकजुटीने काम करण्याची ही वेळ आहे. सर्वांनी आपले कर्तव्य ओळखून पूर्ण तयारी करावी. जशी वेळ येईल, तसे आपले कर्तव्य बजावण्यासाठी मागेपुढे पाहू नका," असे आवाहन त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि पोलीस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी आपापल्या विभागाच्या तयारीबाबत माहिती दिली आणि जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने घेतलेली ही तातडीची बैठक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले निर्देश, जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.