भारत आणि पाकिस्तान या दोन अण्वस्त्रसज्ज देशांमधील संघर्ष गंभीर रूप घेताना दिसत होता. दिवसागणिक दोन्ही देशांमधील तणाव वाढत होता. मात्र आता दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांमध्ये हा तणाव पूर्ण निवळेल अशी अपेक्षा केली जात आहे. भारत-पाकिस्तानमधील या संघर्षाशी संबंधित सर्व अपडेट्स तुम्हाला इथे एकाच ठिकाणी वाचता येतील :
भारत आणि पाकिस्ताननं पूर्ण शस्त्रसंधीवर सहमती दर्शवल्याचं ट्रम्प यांनी काही मिनिटांपूर्वी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेला तणाव आणि गेल्या चार दिवसांत झालेल्या संघर्षानंतर आता दोन्ही देशांनी या शस्त्रसंधीसाठी तयारी दर्शवल्याचं ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली.
"अमेरिकेने रात्री उशीरापर्यंत केलेल्या मध्यस्थीच्या चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तान यांनी पूर्ण आणि तात्काळ शस्त्रसंधी करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही देशांनी दाखवलेल्या समजूतदारपणाबद्दल आणि विवेकाबद्दल त्यांचे धन्यवाद.' असं Truth Social वर त्यांनी पोस्ट केलं आहे.
दरम्यान, शस्त्रसंधीला काही तास उलटायच्या आधीच त्याच्या उल्लंघनाबाबत बातम्या समोर येत आहेत. अद्याप काहीही अधिकृत माहिती आलेली नाही. पण जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक पोस्ट केली आहे.
"शस्त्रसंधीचं नेमकं काय झालं. संपूर्ण श्रीनगरमध्ये स्फोटाचे आवाज येत आहेत," असं त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे
बीबीसी प्रतिनिधी माजीद यांनी म्हटलं की, आम्ही आरएस पुरा येथील रहिवाशांशी बोललो. त्यांनी जवळपास अर्धातासापासून फायरिंग सुरू असल्याचं सांगितलं.
तर स्वर्ण लाल यांनी बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं की, अंदाजे 5 वाजेच्या सुमारास 15 मिनिटे फायरिंग झाली. त्यानंतर शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर तासभर फायरिंग थांबली. पण आता पुन्हा पाकिस्तानकडून फायरिंग होत आहे.
परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषदभारतीय परराष्ट्र मंत्रालयानं एक पत्रकार परिषद घेतली. यावेळेस परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, 'पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सनी भारताच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सशी संपर्क केला. त्यामध्ये दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारचा गोळीबार आणि लष्करी हालचाली थांबवल्या जातील. आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून हे अंमलात येईल. त्यानंतर 12 मे रोजी पुन्हा एकदा या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होईल असे निश्चित करण्यात आले आहे.'
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशक डार यांनीही ट्वीट करुन याची माहिती दिली आहे. 'भारत आणि पाकिस्तान यांनी शस्त्रसंधीला तात्काळ तयारी दर्शवली आहे. पाकिस्तानने नेहमीच प्रदेशात (भारतीय उपखंडात) शांतता आणि सुरक्षा राहावी तसेच सार्वभौमत्व आणि प्रादेशिक एकात्मतेला बाधा येऊ नये यासाठी प्रयत्न केले आहेत.' असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
तर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही भारत पाकिस्तान या दोन्ही देशांनी गोळीबार व लष्करी हालचाली थांबवण्यास सहमती दिल्याचं ट्वीटरवर जाहीर केलं आहे. भारतानं कोणत्याही प्रकारच्या दहशवातबाबत तडजोड न करण्याची भूमिका कायम ठेवल्याचं आणि यापुढेही तीच भूमिका कायम ठेवली जाईल असं जयशंकर यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबियो यांनी ट्वीट केले आहे, "गेल्या 24 तासांत उपराष्ट्राध्यक्ष जेडी वान्स आणि मी भारत आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाहबाज शरीफ, भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर, पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर तसंच सुरक्षा सल्लागार अजित डोव्हाल आणि असीम मलिक यांच्याशीही बोललो.
मला हे जाहीर करताना आनंद वाटतो की भारत आणि पाकिस्तानच्या सरकारांना तात्काळ शस्त्रसंधी मान्य केली आहे आणि वेगवेगळ्या विषयांवर त्रयस्थ जागी बातचीत करण्याची तयारी दाखवली आहे.
पंतप्रधान मोदी आणि शरीफ यांनी शांततेचा मार्ग निवडण्यासाठी दाखवलेलं समजूतदारपणा, विवेक आणि मुत्सद्दीपणा यासाठी आम्ही त्यांची प्रशंसा करतो."
शस्त्रसंधीनंतर कर्नल सोफिया कुरेशी काय म्हणाल्या?
भारताच्या अखंड सुरक्षेसाठी भारतीय सैन्य पूर्णपणे तयार आहे, असंही कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत ठामपणे सांगितलं.
सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चाशस्त्रसंधीच्या निर्णयाआधी भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली होती.
सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्याशी चर्चा केली. दोन्ही देशांमधील लष्करी संघर्ष संपवण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठीच्या प्रयत्नांवर त्यांनी चर्चा केली.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानंही सौदीचे परराष्ट्र मंत्री आणि इशाक दार यांच्यात झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटलं की , "इशाक दार यांनी त्यांना काल रात्रीच्या भारतीय हल्ल्यांनंतर आणि पाकिस्तानच्या प्रत्युत्तर कारवाईनंतर प्रदेशातील सद्यस्थितीबद्दल माहिती दिली."
त्याचवेळी, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने प्रिन्स फैसल बिन फरहान यांच्याशी झालेल्या संभाषणाबाबत अद्याप काहीही माहिती दिलेली नाही.
भारत सरकारकडून पत्रकार परिषद घेत सध्याच्या घडामोडींवर माहिती दिली गेली.
"पाकिस्तानच्या मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाया प्रक्षोभक आहेत, तरीही या कारवायांना भारतानं अत्यंत जबाबदारीनं प्रत्युत्तर दिलं," असं भारत सरकारनं सांगितलं.
पत्रकार परिषदेत माहिती देताना कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, "पाकिस्तानच्या सैन्यानं संपूर्ण पश्चिम सीमेवर सातत्याने आक्रमक हल्ले केले. पाकिस्ताननं युकॅब ड्रोन, लाँग रेंज वेपन, लॉयटरिंग म्युनिशन आणि लढाऊ विमानांचा उपयोग करत भारतीय सैन्य तळांना लक्ष्य केलं.
"नियंत्रण रेषेवरही ड्रोनची घुसखोरी आणि मोठ्या शस्त्रास्त्रांनी गोळीबार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय सीमा आणि एलओसीवर, श्रीनगरपासून नलियापर्यंत 26 हून अधिक ठिकाणी घुसखोरीचे प्रयत्न करण्यात आले. भारतीय सशस्त्र दलानं बहुतांश हल्ल्यांना यशस्वीपणे निष्क्रिय केलं."
भारतानं पत्रकार परिषेदत दिली ही माहिती :
कर्नल सोफिया यांनी भारतीय सुरक्षा दलाच्या शस्त्रास्त्रांनी एलओसीवर पाकिस्तानच्या ठिकाणांना उद्ध्वस्त केल्याची माहिती देत पत्रकार परिषदेत त्याचे व्हिडीओही दाखवले.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पाकिस्तानचे कोणते मुद्दे फेटाळले?भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी शनिवारी (10 मे) पत्रकार परिषद घेत पाकिस्तानकडून 'भारताच्या पायाभूत सुविधांवर हल्ले' झाल्याचे दावे 'खोटे' असल्याचं म्हटलं.
विक्रम मिस्री म्हणाले, "भारताच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा, वीज प्रणाली, सायबर प्रणाली इत्यादींवर मोठ्या प्रमाणात हल्ला होऊन ते नष्ट झाल्याचे दावे पूर्णपणे खोटे आहेत."
"मी सर्वांना आवाहन करतो की, पाकिस्तान सरकारकडून पसरवल्या जाणाऱ्या खोट्या माहितीनं कृपया दिशाभूल होऊ देऊ नका," असंही आवाहन मिस्री यांनी केलं.
विक्रम मिस्री पुढे म्हणाले, "पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून असा हास्यास्पद दावा केला जात आहे की भारताने श्री अमृतसर साहिबवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. मात्र भारताचे विभाजन करण्यासाठीचे हे कमकुवत प्रयत्न अयशस्वी होणारच."
भारतानं अफगाणिस्तानवर क्षेपणास्त्रे डागल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता.
या आरोपांचे खंडन करताना विक्रम मिस्री म्हणाले, "भारतीय क्षेपणास्त्रांनी अफगाणिस्तानला लक्ष्य केले आहे हा आणखी एक हास्यास्पद दावा आहे."
"हा पूर्णपणे निराधार आरोप आहे आणि मी फक्त एवढेच सांगू इच्छितो की, अफगाणिस्तानातील लोकांना हे आठवण करून देण्याची गरज नाही की गेल्या दीड वर्षात कोणत्या देशाने अफगाणिस्तानातील नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांना अनेक वेळा लक्ष्य केलं आहे," असंही मिस्री यांनी नमूद केलं.
'पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मू-काश्मीरमधील अधिकाऱ्याचा मृत्यू'पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात जम्मू-काश्मीरमधील एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली.
ओमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटलं, "राजौरीहून दुःखद बातमी. आपण जम्मू-काश्मीर प्रशासकीय सेवेतील एक समर्पित अधिकारी गमावला आहे. ते शुक्रवारी (9 मे) उपमुख्यमंत्र्यांसोबत राजौरीत होते आणि माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाइन बैठकीला उपस्थित होते."
राजौरी शहरात पाकिस्तानकडून गोळीबार होत असल्याची माहिती ओमर अब्दुल्ला यांनी दिली.
ते म्हणाले, "आज (10 मे) पाकिस्तानने राजौरी शहरावर गोळीबार केला. यादरम्यान, अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थापा यांच्या घराला लक्ष्य करण्यात आलं. त्या हल्ल्यात राजकुमार थापा यांचा मृत्यू झाला"
'पहिल्यांदाच जम्मूच्या मध्यभागी असलेल्या भरवस्तीत हल्ला'जम्मू शहरातील रेहादी कॉलनी या परिसरात सकाळी झालेल्या हल्ल्यानंतर घरांचे नुकसान झाले. या हल्ल्यात अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या, असं स्थानिकांनी बीबीसीला सांगितलं.
शहराच्या मध्यभागी असलेल्या नागरी वस्तीला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे, असंही स्थानिकांनी नमूद केलं.
स्थानिक रहिवासी राकेश गुप्ता यांनी एक मोठा आवाज ऐकला आणि परिसरात धुराचे लोट पसरले. राकेश गुप्ता म्हणाले, "तिथे भीती आणि गोंधळाचे वातावरण होते. पाकिस्तान सामान्य लोकांना का लक्ष्य करत आहे?"
काही लोक जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, अशीही माहिती देण्यात आली.
बीबीसी टीम तिथे असताना जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला घटनास्थळी पोहचले. मात्र, अचानक जेट विमानांनी आकाशातून उड्डाण करण्यास सुरुवात केल्यामुळं त्यांना तेथून निघून जावं लागलं.
यावेळी हवाई हल्ल्याचे सायरन वाजले आणि लोकांना बाहेर पडण्यास सांगण्यात आलं.
या हल्ल्यानंतर घटनास्थळी काय स्थिती आहे, पाहा माध्यमातून. फोटो पाहण्यासाठी .
जी-7 देशांनी भारत आणि पाकिस्तानला काय आवाहन केलं?जी-7 देशांनी भारत आणि पाकिस्तानला शांतता राखण्यास आणि एकमेकांशी थेट चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे.
दोन्ही देशांमधील तणाव वाढत असताना जी-7 देशांनी हे आवाहन केलं आहे.
कॅनडाने जारी केलेल्या निवेदनात, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, अमेरिका, ब्रिटन आणि युरोपियन युनियनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी 22 एप्रिलला जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.
यासोबतच, जी-7 देशांनी भारत आणि पाकिस्तान दोघांनाही संयम बाळगण्यास सांगितलं आहे.
जी-7 च्या निवेदनात म्हटलं आहे, "दोन्ही देशांनी एकमेकांशी बोलून तणाव वाढवण्याऐवजी शांततापूर्ण तोडग्याकडे वाटचाल करावी, अशी आमची इच्छा आहे."
पाकिस्तानला IMF कडून 1.3 अब्ज डॉलर्सचं कर्ज मंजूरभारत-पाकिस्तान तणाव सुरू असतानाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) पाकिस्तानला 1.3 अब्ज अमेरिकन डॉलर्सचं कर्ज मंजूर केलं आहे. आयएमएफनं विस्तारित निधी सुविधेच्या (ईएफएफ) अंतर्गत पाकिस्तानला तात्काळ हा निधी दिला.
दुसरीकडे पाकिस्तानला कर्ज देण्यासाठी झालेल्या मतदानात भारताने सहभाग घेतला नाही. आतापर्यंतचा पाकिस्तानचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता पाकिस्तानकडून या निधीचा गैरवापर सीमेपलिकडे राज्यपुरस्कृत दहशतवादासाठी केला जाऊ शकतो, अशी भीती भारताने भीती व्यक्त केली.
आयएमएफनं शुक्रवारी (9 मे) 1 अब्ज डॉलरच्या ईएफएफ कर्ज कार्यक्रमाचा आढावा घेतला. तसेच पाकिस्तानसाठी 1.3 अब्ज डॉलर्सच्या नवीन लवचिकता आणि स्थिरता सुविधा (आरएसएफ) कर्ज कार्यक्रमावर निर्णय घेतला.
भारतानं एक निवेदन जारी करून म्हटलं, "पाकिस्तान बऱ्याच काळापासून आयएमएफकडून कर्ज घेत आहे. परंतु आयएमएफच्या अटींचे पालन करण्याचा पाकिस्तानचा ट्रॅक रेकॉर्ड खूपच खराब आहे."
"गेल्या 35 वर्षांत पाकिस्तानने 28 वर्षे आयएमएफकडून कर्ज घेतले आहे. 2019 पासून गेल्या 5 वर्षांत आयएमएफचे 4 मदत कार्यक्रम झाले. ही मदत यशस्वी झाली असती, तर पाकिस्तानला पुन्हा या कार्यक्रमांतर्गत कर्ज घेण्याची वेळ आली नसती," अशी भूमिका भारतानं घेतली आहे.
भारतानं म्हटलं की, पाकिस्तानची ट्रॅक रेकॉर्ड पाहता असं दिसतं की, एकतर आयएमएफ कार्यक्रमाची योग्यरित्या आखणी झालेली नाही किंवा या कार्यक्रमाची योग्य देखरेख ठेवण्यात आली नाही किंवा पाकिस्ताननं या कार्यक्रमाची योग्य अंमलबजावणी केलेली नाही.
"पाकिस्तानी सैन्य आर्थिक बाबींमध्ये हस्तक्षेप करते. त्यामुळे धोरणात्मक चुक आणि सुधारणा उलटण्याचा धोका वाढला आहे. पाकिस्तानमध्ये लोकनियुक्त सरकार असले, तरी पाकिस्तानी लष्कर देशांतर्गत राजकारणात मोठी भूमिका बजावते. तसेच अर्थव्यवस्थेतही हस्तक्षेप करते", असंही भारतानं म्हटलं.
सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांना बक्षीस देणं चुकीचं असल्याचं मत भारतानं व्यक्त केलं आहे. तसेच यामुळे जगाला चुकीचा संदेश जाईल आणि निधी देणाऱ्या संस्था आणि देणगीदारांची प्रतिमा डागाळेल, असंही नमूद केलं.
भारतानं म्हटलं, "आयएमएफसारख्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून येणारा पैसा दहशतवादासाठी वापरला जाऊ शकतो. अनेक देशांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. आयएमएफचे नियम आणि कार्यपद्धती अशा आहेत की ते काहीही करू शकत नाही. ही एक गंभीर समस्या आहे. जागतिक वित्तीय संस्थांनी त्यांच्या प्रक्रियांमध्ये नैतिक मूल्यांचा समावेश केला पाहिजे. आयएमएफने भारताच्या भूमिकेवर आणि मतदानात सहभागी न होण्याच्या निर्णयाकडे लक्ष दिलं आहे."
पाकिस्तानचं 'ऑपरेशन बुनयान मरसूस'पाकिस्तान लष्कराच्या जनसंपर्क विभागानं म्हटलं आहे, "पाकिस्ताननं भारताविरुद्ध प्रतिहल्ला सुरू केला आहे." मात्र भारतानं पाकिस्तानच्या या दाव्यांवर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
पाकिस्तानी लष्कराचा जनसंपर्क विभाग आयएसपीआरनुसार, पाकिस्ताननं भारताविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईला 'ऑपरेशन बुनयान मरसूस' असं नाव दिलं आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढण्यास सुरुवात झाली. भारतानं बुधवारी (7 मे) पहाटे 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी हल्ले केले होते.
या हल्ल्यानंतर, पाकिस्तानने 33 लोकांचा मृत्यू होऊन मोठं नुकसान झाल्याची कबुली दिली.
भारतानं 3 लष्करी तळांवर हल्ला केला - पाकिस्तानभारताने आमच्या तीन लष्करी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत, असं पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. मात्र, भारताने पाकिस्तानच्या या आरोपावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
पाकिस्तानच्या लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सरकारी टीव्हीवर बोलताना पाकिस्तानी लष्करानं भारताला 'प्रत्युत्तर' देण्याची कारवाई सुरू केल्याचं म्हटलं.
अहमद शरीफ चौधरी यांनी दावा केला की, "पाकिस्तानी लष्कराच्या हवाई संरक्षण यंत्रणेने भारताची बहुतेक क्षेपणास्त्रे पाडली आहेत. तसेच, पाकिस्तानचे सैन्य 'पूर्णपणे तयार' आहे."
पाकिस्तानने ज्या लष्करी विमानतळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे, त्यापैकी एक म्हणजे रावळपिंडीतील नूर खान, जे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे.
असं असलं तरी, या दाव्यांवर भारताकडून अद्याप काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने (डीजीसीए) देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागातील 32 विमानतळांवरून नागरी उड्डाणं बंद केली आहेत.
भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) आणि संबंधित विमान वाहतूक अधिकाऱ्यांना अनेक 'नोटिस टू एअरमन' जारी करण्यात आल्या आहेत. यानुसार 15 मे रोजी सकाळी 5:29 वाजेपर्यंत नागरी उड्डाणं बंद राहतील.
ज्या विमानतळांवरून नागरी उड्डाणं बंद करण्यात आली आहेत त्यामध्ये उधमपूर, अंबाला, अमृतसर, अवंतीपुरा, भटिंडा, भुज, बिकानेर, चंदीगड, हलवारा, हिंडन, जैसलमेर, जम्मू, जामनगर, जोधपूर, कांडला, कांगडा (गग्गल), केशोद, किशनगढ, कुल्लू मनाली (भुंतर), लेह, लुधियाना, मुंद्रा, नलिया, पठाणकोट, पटियाला, पोरबंदर, राजकोट (हिरासर), सरसावा, शिमला, श्रीनगर, थोईसे आणि उत्तरलाई या विमानतळांचा समावेश आहे.
एअर इंडियाने सोशल मीडियावर माहिती दिली आहे की, विमान वाहतूक अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर, जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, चंदीगड, भुज, जामनगर आणि राजकोट इत्यादी ठिकाणांवरील उड्डाणे 15 मेपर्यंत (सकाळी 5.29 वाजेपर्यंत) रद्द करण्यात येत आहेत.
बारामुल्लापासून भुजपर्यंत ड्रोन आढळले, फिरोझपूरमध्ये नागरी भागावर हल्लाशुक्रवारी (9 मे) रात्री बारामुल्लापासून भुजपर्यंत 26 ठिकाणी सशस्त्र ड्रोन्स आढळून आले. पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळची ही ठिकाणं आहेत.
यामध्ये काही सशस्त्र ड्रोन असल्याचा संशय असून ते नागरी तसेच लष्करी ठिकाणांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे, अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.
या ठिकाणांमध्ये बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपोरा, नगरोटा, जम्मू, फिरोझपूर, पठाणकोट, फाजिल्का, लालगढ जट्टा, जैसलमेर, बाडमेर, भुज, कुवारबेट आणि लखी नाला यांचा समावेश आहे.
एका सशस्त्र ड्रोनने फिरोझपूरमध्ये नागरी भागावर हल्ला केला. त्यात एका स्थानिक कुटुंबातील सदस्य गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी पाठवण्यात आलं असून सुरक्षादलांनी परिसराची पूर्णपणे तपासणी केली.
भारतीय संरक्षण दलं सतर्क असून हवेतून येणाऱ्या संभाव्य धोक्यांवर नजर ठेवून आहेत. तसंच गरज भासल्यास त्वरित कारवाईसाठी सज्ज असल्याचंही सांगण्यात आलं.
सीमा भागांतील नागरिकांना घरामध्येच राहण्याचा, अनावश्यक हालचाल टाळण्याचा आणि स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या सुरक्षिततेसंबंधी सूचना काटेकोरपणे पाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. घाबरण्याचे काही कारण नाही, मात्र सतर्कता आणि काळजी आवश्यक आहे, असं लष्करानं स्पष्ट केलं आहे.
बीबीसीचे सहयोगी पत्रकार रविंदर सिंग रॉबिन यांनी अमृतसरमध्येही मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू येत असल्याची माहिती दिली.
तसंच फिरोजपूरमधील स्थानिकांनी किमान तीन स्फोटांचे आवाज ऐकल्याचं पंजाबमधील बीबीसीच्या स्थानिक पत्रकारांनी म्हटलं आहे.
फिरोजपूर प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानंही तीन स्फोटांचे आवाज ऐकल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
बीबीसीच्या पत्रकार नवजोत कौर यांच्या मते, उपायुक्त निशांत यादव यांच्या आदेशानुसार, चंदीगडमधील बाजारपेठा संध्याकाळी 7 वाजता पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत
याशिवाय आज शुक्रवारी रात्री (9 मे) जम्मू आणि काश्मीरमधून पुन्हा एकदा गोळीबाराच्या बातम्या समोर आल्या आहेत.
सध्या श्रीनगरमध्ये असलेले बीबीसी प्रतिनिधी माजिद जहांगीर यांनी दिलेल्या माहितीनुसार कुपवाडा, उरी आणि पूंछमध्ये संध्याकाळी 7.20 वाजता गोळीबार सुरू झाला.
ANI वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, उरी सेक्टरमध्ये गोळीबार आणि स्फोटांचे आवाज ऐकू आले.
याशिवाय, पठाणकोटमधील बीबीसी टीमला स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत.
त्याआधी शुक्रवारी दुपारी (9 मे) भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी यांनी गुरुवारी रात्री भारताच्या विविध भागात झालेल्या हल्ल्यांची माहिती दिली.
सोफिया कुरेशी म्हणाल्या, "गुरुवारी (8 मे) रात्री पाकिस्तानी सैन्याने भारतीय लष्करी तळांना लक्ष्य केले."
पाकिस्तानकडून 300 ते 400 ड्रोन सोडण्यात आल्याचं त्या म्हणाल्या. पण पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी असे हल्ले केल्याचं नाकारलं.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आणि सैन्य प्रमुखांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान कार्यालयाने X वर केलेल्या पोस्टमध्ये ही माहिती दिली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)