नागपूर : नागपूर विभागात शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आला. या घोटाळ्यात बड्या अधिकाऱ्यांची नावे समोर आली. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले. दरम्यान या प्रकाराने प्राथमिक शिक्षण विभागातील वेतन अधीक्षक निलेश वाघमारे यांच्या निलंबनानंतर बराच काळ हे पद रिक्त असल्याने प्राथमिक शिक्षकांचे वेतन अडकले.
आता या पदाचा अतिरिक्त कार्यभार गौतम गेडाम यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र, अद्यापही शिक्षकांचे वेतन झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी शालार्थ आयडी प्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
त्यानंतर प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना अटक करण्यात आली. त्यानंतर कार्यालयातील चार कर्मचाऱ्यांसह एक शिक्षक, संस्थाचालक आणि प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आली. त्यांना अटक केल्यावर जवळपास ६२२ आयडी जनरेट करण्यात आल्याची बाब लक्षात आली.
प्रत्यक्षात १ हजार ५६ शिक्षकांचा समावेश आहे. या प्रकाराने आता प्राथमिक शिक्षण विभाग सावधगिरीने पावले टाकत आहे. निलेश वाघमारे यांच्या निलंबनानंतर विभागाने शिक्षकांना नव्याने बील सादर करण्यास सांगितले.
त्यानुसार आता बीलांची काळजीपूर्वक तपासणी केल्या जात आहे. त्यामुळे पगारास उशीर होत असल्याचे कारण सांगण्यात येत आहे. मात्र, दोन महिन्यांपासून ज्या शिक्षकांचे वेतन झाले नाहीत, त्या शिक्षकांना बऱ्याच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या शिक्षकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.
प्रत्येक शिक्षकाचे वेतन बिल काळजीपूर्वक तपासण्यात येत असल्याने उशीर होत आहे. ही प्रक्रिया येत्या आठवड्यात पूर्ण होणार असून पुढल्या आठवड्यात निश्चित सर्व शिक्षकांचे पगार होणार आहे.
-गौतम गेडाम,
प्रभारी वेतन अधीक्षक, प्राथमिक शिक्षण विभाग