श्रीलंकेमध्ये नुकतीच महिला तिरंगी वनडे मालिका खेळवण्यात आली आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत भारत आणि श्रीलंका संघांनी अंतिम सामन्यात स्थान मिळवला.
भारत आणि श्रीलंका महिला संघात रविवारी (११ मे) अंतिम सामना आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात भारताची उपकर्णधार स्मृती मानधनाने शतक करत मोठा पराक्रम केला आहे.
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रतिका रावल आणि सलामीलाच ७० धावांची भागीदारी केली. प्रतिका ३० धावांवर बाद झाल्यानंतर मानधनाला हर्लिन देओलची साथ मिळाली. या दोघींमध्येही शतकी भागीदारी झाली.
यादरम्यान सांगलीची रहिवाशी असणाऱ्या मानधनाने आक्रमक खेळताना आधी अर्धशतक पूर्ण केले आणि मग तिने शतकालाही गवसणी घातली. अखेर तिचा अडथळा ३३ व्या षटकात देवामी विहंगाने दूर केला. मानधनाने १०१ चेंडूत ११६ धावांची खेळी केली.
या खेळीत तिने १५ चौकार आणि २ षटकार खेचले. मानधनाचे हे कारकिर्दीतील १०२ सामन्यातील ११ वे शतक आहे. ती वनडेत ११ शतके करणारी भारताची पहिलीच खेळाडू ठरली आहे. तिच्यानंतर मिताली राज (७ शतके) आणि हरमनप्रीत कौर (६ शतके) समावेश आहे.
तसेच मानधना आता महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या जगातील खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. तिने ताम्सिन ब्युमाँट या इंग्लंडच्या खेळाडूच्या १० शतकांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. मानधनाच्या पुढे आता मेग लॅनिंग आणि सुझी बेट्स या दोघीच आहेत.
१५ शतके - मेग लॅनिंग (१०३ सामने)
१३ शतके - सुझी बेट्स (१७१ सामने)
११ शतके - स्मृती मानधना (१०२ सामने)
१० शतके - ताम्सिन ब्युमाँट (१२७ सामने)
स्मृती मानधना बाद झाल्यानंतरही हर्लिन देओल (४७), हरमनप्रीत कौर (४१), जेमिमाह रोड्रिग्स (४४) यांनीही चांगल्या खेळी केल्या. पण या तिघींचेही अर्धशतके थोडक्यात हुकली. शेवटी अमनज्योत कौर आणि दिप्ती शर्मा यांनी मिळून भारताला ५० षटकात ७ बाद ३४२ धावांपर्यंत पोहचवले.
अमनज्योत १८ धावांवर शेवटच्या षटकात बाद झाली, तर दीप्ती २० धावांवर नाबाद राहिली. आता श्रीलंकेसमोर विजयासाठी ३४३ धावांचे मोठे लक्ष्य आहे.
श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना मालकी मदारा, देवकी विहंगा आणि सुगंधीका कुमारी यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. इनोका अट्टापट्टूने १ विकेट घेतली.