Jalna Weather Update : जालना जिल्ह्यात पावसाचा आज 'येलो' अलर्ट; पुढील तीन दिवस कसे असेल हवामान?
esakal May 11, 2025 07:45 PM

जालना : जिल्ह्यात पुढील तीन दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता कुलाबा येथील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने वर्तवली आहे. दरम्यान, रविवारी ( ता. ११) जिल्ह्याला '' येलो'' अलर्ट देण्यात आला आहे.

जिल्ह्यात ५ ते ६ मे दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, आता पुन्हा एकदा पावसाचा '' येलो'' अलर्ट जारी करण्यात आला आहे. ११ मे रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटसह, वादळ , सोसाट्याचा वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच १२ व १३ मे दरम्यान, ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आली. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पारा ७ अंशांनी घसरला

उन्हाळ्याच्या तडाख्याने हैराण झालेल्या नागरिकांना सध्या काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्याचे तापमान आठवडाभरापूर्वी ४३ अंशापर्यंत गेले होते. त्यामुळे नागरिक उकाड्याने त्रस्त झाले होते. मात्र, या आठवड्यात पारा ३६ अंशापर्यंत घसरल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.