पुणे, ता. ११ : वाघोली परिसरातील गृहप्रकल्पाच्या आवारात असलेले महावितरणचे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) चोरट्यांनी चोरून नेले. तीन लाख ८० हजार रुपये किमतीच्या रोहित्र चोरीप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणचे सहाय्यक अभियंता दीपक बाबर यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोलीतील एका गृहप्रकल्पासाठी महावितरणकडून २०२० मध्ये उच्च क्षमतेचे रोहित्र बसविण्यात आले होते, तर जुने रोहित्र गृहप्रकल्पाच्या आवारात पडून होते. १९ एप्रिलला महावितरणचे कर्मचारी नीलेश तिजारी वीज मीटरची नोंदणी (रीडिंग) घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी जुने रोहित्र जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर महावितरणकडून चौकशी करण्यात आली. रोहित्र चोरीला गेल्याचे निष्पन्न झाल्यानंतर फिर्याद देण्यात आली.