Majalgaon Crime : बोगस दानपत्र तयार करून शासकीय जमीन विकली; नगरपालिका कार्यालयीन अधीक्षकासह ५ जणांवर गुन्हा
Saam TV May 11, 2025 08:45 PM

योगेश काशीद 
बीड
: माजलगांव शहरातील सर्वे नंबर ६ मध्ये असलेली खुल्या भूखंडाची जमीन बोगस कागदपत्र तयार करून व नगरपालिका कर्मचाऱ्यांशी हाताशी धरून विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी नगरपालिकेचे तात्कालीन कार्यालयीन अधीक्षकासह तीन कर्मचारी व खोटे दस्तावेज तयार करणाऱ्या अस्लम बेग याच्या विरोधात शहर पोलिसात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडच्या शहरातील मानुर रोड लगत असलेली सर्वे नंबर ६ मधील जमिनीस १६ सप्टेंबर २०२४ रोजी चार हजार स्क्वेअर फुट जागेस लेआउटला मान्यता देण्यात आली. तसेच या जमिनीतील ४०८ स्क्वेअर फुट जागा ही ओपन स्पेस म्हणून ठेवण्यात आली होती. सदरची जमीन ही प्रकाश दयाराम जोशी यांच्या नावे होती. याच जागेची परस्पर विक्री करण्यात आल्याचा प्रकार करण्यात आला आहे. या प्रकरणाची मुख्याधिकाऱ्यांना आठ महिन्यानंतर जाग आली आहे. 

पालिका कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन जागा हडपण्याचा प्रयत्न 

सदरच्या ओपन स्पेसच्या जागेवर अस्लम बेग मंजुर बेग मिर्झा याने नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक गणेश पुंडलिक डोंगरे, नामांतर प्रमुख फुलचंद कटारे, पीटीआर प्रमुख सुधाकर रामभाऊ उजगरे, कर निरीक्षक वाजेद अली आबेद अली यांना हाताशी धरून शंभर रुपयाच्या बॉण्डवर मूळ मालकाचे दानपत्र व खोटे कागदपत्र तयार केले. यानंतर नगरपालिकेच्या या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बनावट आदेश, पीटीआर व गावठाण प्रमाणपत्र तयार करून शासनाची दिशाभूल करून शासकीय जागा हडपण्याचा प्रयत्न केला.

पाच जणांवर गुन्हा दाखल 
दरम्यान याप्रकरणी नगरपालिकेचे सहाय्यक नगररचनाकार आकाश राठोड यांच्या तक्रारीवरून अस्लम बेग मंजुर बेग मिर्झा, गणेश पुंडलिक डोंगरे, फुलचंद कटारे, सुधाकर उजगरे, वाजेद अली आबेद अली यांच्यावर शहर त फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अस्लम बेग मिर्झा यास पोलिसांनी अटक केली असून बाकी आरोपी फरार झाले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश माकणे करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.