नांदेड : नांदेड ग्रामीण पोलिसांनी रात्री पेट्रोलिंगदरम्यान बोढार गावाजवळील पुलाजवळ कारवाई करत तब्बल २५ लाख रुपयांची अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पकडला. टिप्परचालक राम शत्रुघ्न सोनटक्के (रा. ब्राह्मणवाडा, ता. नांदेड) याच्यावर गुन्हा नोंदविला आहे.
पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्या आदेशाच्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनात नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
शनिवारी (ता.१०) रात्री दोनच्या सुमारास बोढार गावाजवळील ब्रिज परिसरात संशयास्पद टिप्पर फिरताना आढळून आला. पोलिसांनी थांबवून चौकशी केली असता, टिप्पर चालकाकडे वाळू वाहतुकीसाठी कोणताही परवाना अथवा रॉयल्टी नसल्याचे उघड झाले.
त्यामुळे टिप्पर व त्यातील पाच ब्रास रेती असा एकूण २५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोउपनि. मटवाड, पोहेकॉ केंद्रे, पोकॉ पवार, आवळे, कल्याणकर, पचलिंग, कवठेकर आदींच्या पथकाने केली.