स्मृती मंधाना हीच्या धमाकेदार शतकानंतर स्नेह राणा आणि अमनज्योत कौर या जोडीने केलेल्या धारदार बॉलिंगच्या जोरावर टीम इंडियाने ट्राय सीरिजमधील अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 97 धाावंनी धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 343 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेला पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. टीम इंडियाने श्रीलंकेला 48.2 षटकांमध्ये 245 धावांवर गुंडाळलं. भारताने यासह श्रीलंकेचा हिशोब बरोबर केला. श्रीलंकेने भारताला गेल्या वर्षी आशिया कप फायनलमध्ये पराभूत केलं होतं. भारताने ट्राय सीरिजमध्ये विजय मिळूवन त्या पराभवाची परतफेड केली.
स्मृती मंधाना हीने केलेल्या 116 धावांच्या शतकी खेळीमुळे भारताने सहजासहजी 340 पार मजर मारली. तसेच इतरांनी चांगली साथ दिली. त्यामुळे श्रीलंकेला 343 धावांचं डोंगराएवढं आव्हान मिळालं. फलंदाजांनंतर भारतीय गोलंदाजांनी त्यांची भूमिका छानपणे पार पाडली. टीम इंडियाने श्रीलंकेला पहिल्या ओव्हरमधील तिसऱ्याच बॉलवर झटका दिला. हसिनी परेरा हीला अमनज्योत कौर हीने आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
त्यानंतर श्रीलंकेच्या फलंदाजांनी संयमी खेळ करत सामन्यात स्वत:ला कायम ठेवलं. मात्र दुसऱ्या बाजूने टीम इंडियाकडूनही श्रीलंकेला ठरावित अंतराने झटके देणं सुरुच होतं. त्यामुळे श्रीलंकेच्या बहुतांश फलंदाजांना चांगली सुरुवात मिळूनही एकालाही मोठी खेळी करता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना मोठी खेळी करण्याआधीच मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
श्रीलंकेसाठी कर्णधार चमारी अटापटू हीने सर्वाधिक 51 धावा केल्या. निकाशी डी सिल्वा हीने 48 धावांचं योगदान दिलं. विश्मी गुणरत्नेने 36 रन्स केल्या. मात्र याव्यतिरिक्त इतरांना 30 पारही मजल मारता आली नाही. टीम इंडियाकडून स्नेह राणा हीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. अमनज्योत कौर हीने तिघांना आऊट केलं. श्री चरणी हीने एक विकेट मिळवली. तर टीम इंडियाने कडक फिल्डिंगच्या जोरावर 2 रन आऊट केले.
दरम्यान त्याआधी भारताने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. स्मृती मंधाना हीने 101 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 15 फोरसह 116 रन्स केल्या. तसेच कर्णधार हरमनप्रीत कौर 41, जेमिमाह रॉड्रिग्ज 44 आणि हर्लीन देओल हीने 47 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला 342 धावा करता आल्या. तर श्रीलंकेकडून मल्की मादारा, देवमी विहंगा आणि सुगंदिका या तिघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर इनोका रनवीरा हीने 1 विकेट घेतली.
महिला ब्रिगेडचा दणदणीत विजय
दरम्यान टीम इंडियाने या विजयासह श्रीलंकेचा हिशोब चुकता केला. याच श्रीलंकेने भारताला गेल्या वर्षी टी 20 आशिया कप 2024 स्पर्धेतील अंतिम सामन्यात पराभूत केलं होतं. तो पराभव महिला ब्रिगेडच्या डोक्यात होता. भारताने त्या पराभवाची अचूक परतफेड केली.