वूमन्स टीम इंडियाने रविवारी 11 मे रोजी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये वनडे ट्राय सीरिज फायनलमध्ये यजमान श्रीलंकेचा धुव्वा उडवला. टीम इंडियाने श्रीलंकेवर 97 धावांनी जबरदस्त विजय मिळवला. भारताने श्रीलंकेला 343 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र श्रीलंकेच्या फलंदाजांना भारताच्या गोलंदाजांसमोर पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. श्रीलंकेचा डाव 48.2 ओव्हरमध्ये 245 धावांवर आटोपला. टीम इंडियाने अशापक्रारे श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील 31 वा विजय मिळवला. मात्र या विजयानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर हीने खेळाडूंच्या दुखापतीवरुन चिंता व्यक्त केली. हरमनप्रीतने सामन्यानंतर वेगवान गोलंदाजांना सातत्याने होत असलेल्या दुखापतीबाबत चिंता व्यक्त केली. सपोर्ट स्टाफ यावर वनडे वर्ल्ड कपआधी तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असल्याचं हरमनप्रीतने सांगितलं.
“मला संपूर्ण टीमचा, खास करुन फलंदाजांचा अभिमान आहे. आम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचं होतं. आम्ही टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा विचार करत होतो. आम्ही ज्या पद्धतीने खेळलो त्याबद्दल समाधानी आहोत. आम्ही कधीही सुधारणा करणं थांबवू शकत नाही. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही बाबतीत आणखी सुधारणा करुन चांगलं करु शकतो”, असं हरमनप्रीतने म्हटलं.
“आमचे वेगवान गोलंदाज जखमी होत राहतात. गोलंदाजांच्या दुखापतीबाबतीत काळजी घेणं आवश्यक आहे. कोच त्यावर मेहनत घेत आहेत”, असं हरमनने सांगितलं.
तसेच हरमनने या विजयानंतर ओपनर स्मृती मंधाना हीचं कौतुक केलं. “स्मृती आणि माझ्या व्यतिरिक्त इतरांनी ज्या पद्धतीने बॅटिंग केली ते पाहणं आनंददायी होतं. स्नेह राणाने अप्रतिम बॉलिंग केली”, असं हरमनने म्हटलं. स्मृती आणि स्नेह या दोघींनी अंतिम सामन्यात निर्णायक भूमिका बजावली. स्मृतीने 101 बॉलमध्ये 116 रन्स केल्या. त्यामुळे टीम इंडियाला 300 पार मजल मारता आली. तर त्यानंतर स्नेह राणा हीने सर्वाधिक 4 विकेट्स घेत श्रीलंकेला गुंडाळण्यात मोठं योगदान दिलं.
दरम्यान स्मृती आणि स्नेह राणा या दोघींनी ट्राय सीरिजमध्ये दमदार कामगिरी केली. त्यासाठी दोघींना सन्मानित करण्यात आलं. स्नेह हीने या मालिकेत 15 विकेट्स घेतल्या. त्यासाठी स्नेहला ‘प्लेअर ऑफ द सीरिज’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर स्मृतीला शतकी खेळीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ने गौरवण्यात आलं.