…अन्यथा पाकिस्तान झाला असता बेचिराख, ‘शस्त्रसंधी’ची इनसाईड स्टोरी समोर!
GH News May 12, 2025 01:09 AM

India Pakistan War : भारत पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली असली तरी अद्याप परिस्थिती निवळली नाही. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीनंतर भारतीय सीमाभागात हल्ले करण्यात आले. त्यानंतर आता भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेऊन आतापर्यंत नेमकं काय-काय घडलं? याची माहिती दिली आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यास आम्ही त्यास चोख प्रत्युत्तर देऊ, असं भारतानं ठणकावून सांगितलं आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी नेमकी कशी झाली? हे अनेकांना जाणून घ्यायचं होतं. याबाबत आता खुद्द भारतीय सैन्यानेच सविस्तर सांगितलं आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचा कॉल आला अन्…

पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताने 9 मेच्या रात्री चोख प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर 10 मेच्या सकाळीसुद्धा भारताने पाकिस्तानच्या हल्ल्यांना गोळीबाराने प्रत्युत्तर दिलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यात हा ताणाव चालू असताना अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख असीम मुनीर यांच्याशी चर्चा केली. मुनीर यांच्याशी चर्चा करून रुबियो यांनी भारतीय परराष्ट्रामंत्री एस जयशंकर यांना कॉल केला आणि पाकिस्तान चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले.

दोन देशांच्या डीजीएमओंत चर्चा, नंतर..

याचदरम्यान, पाकिस्तानशी चर्चा फक्त डीजीएमओ यांच्यामार्फतच होईल. या चर्चेत अन्य कोणाचाही सहभाग नसेल, असे भारताने सांगितले. त्यानंतर पाकिस्तानचे डीजीएमओने भारताच्या समकक्ष अधिकाऱ्याशी चर्चा करण्यासाठी दुपारी एक वाजताची वेळ मागितली. पुढे भारत आणि पाकिस्तान यांच्या डीजीएमओ यांच्यात दुपारी तीन वाजेदरम्यान चर्चा झाली. या चर्चेच्या तासांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून भारत-पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे, असे घोषित केले. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही पत्रकार परिषद घेऊन शस्त्रसंधी झाल्याचे सांगितले.

भारत जशास तसे उत्तर देणार

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली असली तरी भारताचे लष्कर सज्ज आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्याची मुभा चिफ ऑफ आर्मी स्टाफने भारतीय कमांडर्सना दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानने आता हल्ला करण्याचे धाडस केल्यास भारताकडून जशास तसं उत्तर देण्यात येणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.