महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. मंडळाने या परीक्षांचा निकाल जाहीर केला आहे. बारावीचा निकाल ५ मे रोजी तर दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर केला. हा निकाल ऑनलाईन होता. आता बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयांमध्ये गुणपत्रक मिळणार आहे. पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि रत्नागिरी या विभागातील विद्यार्थ्यांना १६ मे पासून गुणपत्रक शाळा-महाविद्यालयात मिळणार आहे.
बारावीच्या गुणपत्रिका १६ मेपासून विद्यार्थ्यांच्या शाळा आणि महाविद्यालयात मिळण्यास सुरुवात होणार आहे. बारावीचा निकाल ५ मे रोजी जाहीर झाला. राज्याच्या निकालाची टक्केवारी ९१.८८ टक्के राहिली. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा ९६.७४ टक्के लागला होता. सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा ८९.४६ टक्के राहिला.
बारावीच्या परीक्षेत सर्व विभागीय मंडळातून यंदाही मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी जास्त राहिली. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 94.58 टक्के असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51 टक्के आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ही मुलांपेक्षा 5.07 टक्क्यांनी अधिक आहे. यंदाही मुलींनी बारावीच्या निकालात बाजी मारली होती.
सन 2024-25 मध्ये बारावीची परीक्षा लवकर घेण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाच्या इतिहासात प्रथमच बारावीचा निकल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागला. परंतु यंदा निकालाचा टक्का घसरला आहे. फेब्रुवारी मार्च 2024 चा निकाल 93.37 टक्के होता. तर फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के राहिला आहे. यंदा निकालाची टक्केवारी 1.49 टक्क्यांनी कमी आहे.
दरम्यान, 13 मे रोजी बोर्डाने दहावीचा निकाल जाहीर केला. या निकालातही मुलांपेक्षा मुलींच आघाडीवर राहिल्या. ९६.१४ टक्क्यांसह मुलींनी बाजी मारली आहे. मुलांची टक्केवारी ९२.३१ टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ३.८३ टक्क्यांनी अधिक आहे. दहावीच्या निकालात लातूर बोर्डातील ११३ विद्यार्थ्यांना शंभर पैकी शंभर गुण मिळाले. त्यामुळे लातूर पॅटर्नची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.