Virat Kohli Retirement : भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयानंतर अनेकांना धक्का बसला आहे. या निर्णयानंतर त्याचे चाहतेही चांगलेच नाराज झाले आहेत. दरम्यान, त्याने हा निर्णय नेमका का घेतला? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. असे असतानाच आता एक नवी माहिती समोर येत आहे. निवृत्तीचा निर्णय घेण्याआधी विराच कोहलीने एका खास व्यक्तीकडून सल्ला घेतला होता.
मिळालेल्या माहितीनुसार विराटने निवृत्तीचा निर्णय घेण्याआधी भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक तथा प्रसिद्ध समालोचक रवी शास्त्री यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेनंतर विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
क्रिकबझ या क्रिकेटविषयक माहिती देणाऱ्या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिल आहे. या वृत्तानुसार विराट कोहली गेल्या बऱ्याच दिवसांपासून कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा विचार करत होता. त्याच्या या विचाराबाबत विराटने रवी शास्त्री यांच्याशी सल्लामसलत केली होती. विराट कोहली रवी शास्त्रींना मेंटॉरच्या रुपात पाहतो. रवी शास्त्री भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक असताना विराटक कोहली भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार होता. या काळात दोघांचं नातं फारच चांगलं होतं.
निवृत्तीचा निर्णय घेण्याआधी विराट कोहलीने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली नाही, असे म्हटे जात आहे. इंग्लंडसोबतची कसोटी सामन्यांची मालिका संपेपर्यंत विराट कोहली आपला निर्णय लांबवू शकला असता. विराट कोहली बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला तसेच बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह यांची भेट घ्यायची होती. मात्र भारत-पाकिस्ता यांच्यातील तणावामुळे ही बैठक होऊ शकली नाही. ही भेट झाली असती तर विराटने कदाचित आपल्या निवृत्तीचा निर्णय लांबवला असता.
दरम्यान, विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असला तरी तो भारतीय संघाकडून क्रिकेट खेळताना दिसणार आहे. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा भाग असणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना तो मैदानात क्रिकेट खेळताना पाहायला मिळणार आहे.