संतापजनक! रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने गर्भवतीचा बाळासह दुर्दैवी मृत्यू; नातेवाईकांनी १०८ वर फोन केला, पण..
esakal May 13, 2025 03:45 PM

मंडणगड : मंडणगड तालुक्यातील कुडुकबुद्रुक येथील एका गर्भवती महिलेचा (Pregnant Woman) बाळासह मृत्यू झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. १० मे रोजी हा प्रकार घडला. तालुक्यातील (Health Department) कारभाराचा फटका या महिलेला बसल्याची चर्चा सुरू आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्यकेंद्र, ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या संदर्भात या महिलेच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कुडुक बुद्रुक या गावातील विधी संदेश सावणेकर (वय ३२) या सात महिन्यांच्या गरोदर होत्या. त्यांना अचानक त्रास होऊ लागल्याने कुटुंबातील लोकांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हारे येथे उपचारासाठी आणले. देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता रुग्णवाहिकेद्वारे मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालयात (Mandangad Rural Hospital) पाठवले.

ग्रामीण रुग्णालयात विधी यांची प्रकृती आणखीनच बिघडली. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अधिक उपचाराकरिता दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले; मात्र पुढील उपचारासाठी नेण्यासाठी आवश्यक असणारी रुग्णालयातील रुग्णवाहिकाच उपलब्ध झाली नाही. नातेवाईकांनी १०८ वर फोन केला असता ती रुग्णवाहिका अन्य ठिकाणी गेल्याचे सांगण्यात आले.

१०२ ही रुग्णवाहिका रुग्णालयातच होती. मात्र, विविध कारणे सांगून ती उपलब्ध करून दिली गेली नाही, असे नातेवाइकांनी सांगितले. नाईलाजाने कुटुंबीयांनी खासगी रुग्णवाहिकेचा आधार घेऊन दापोली गाठले. मात्र, रुग्णवाहिकेच्या गोंधळात अधिक वेळ गेल्यामुळे विधी सावणेकर यांचा प्रवासादरम्यान बाळासह मृत्यू झाला.

गर्भवतींसाठी विविध योजना कुठे?

रुग्णवाहिका उपलब्ध नसणे, ऑक्सिजनची उपलब्धता नसणे, चालक नसणे, डिझेल नसणे अशी अनेक कारणे रुग्णवाहिकेसंदर्भात आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहेत. शासनाच्यावतीने गर्भवती महिलांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवा उपलब्ध करण्यात आलेल्या असतानाही मंडणगड तालुक्यांमध्ये या सेवेची अंमलबजावणी का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होतो.

डॉक्टर संपर्काबाहेर

या संदर्भामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे यांच्याशी संपर्क केला असता माहिती घेऊन या संदर्भात अधिक माहिती देतो, असे उत्तर त्यांनी दिले. त्याचबरोबर १२ मे रोजी या संदर्भामध्ये अधिक माहिती घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हारेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हाके यांना संपर्क केला असता त्यांचा दूरध्वनीवर संपर्क होऊ शकला नाही.

कुडुक बुद्रुकमधील त्या महिलेला उच्च रक्तदाबाचा त्रास होत होता. त्यांना अधिक उपचारासाठी दापोलीत नेण्याचा सल्ला दिला गेला; परंतु १०२ रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. कोल्हापूर येथील आरोग्य उपसंचालकांनी चौकशी अधिकारी नेमले आहेत. तत्पूर्वी जिल्हा शल्य चिकित्सकांनी चौकशी केली आहे. अहवालानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल.

- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी

मंडणगड येथील या दुर्दैवी घटनेमुळे तालुक्याची आरोग्यसेवा व्हेंटिलेटरवर असल्याची परिस्थिती आहे. योग्य निदानासाठी लागणारी साधनसामग्री नसल्याने वेळीच उपचार होत नाहीत. चांगले वैद्यकीय अधिकारी येथे का टिकत नाहीत, हा संशोधनाचा विषय आहे. उपचारासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा मिळत नसेल, तर तालुक्यातील आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय कशासाठी आहेत, हा प्रश्न आहे. शासन, प्रशासनाने मानवतेच्या दृष्टीने विचार करून तालुक्यातील नागरिकांसाठी सेवा उपलब्ध करून द्यायला हव्यात. रुग्णांना उपचारासाठी पुढे ढकलाढकलीचा अयोग्य कारभार बंद व्हायला हवा, अन्यथा अशा घटना वारंवार घडत राहतील.

- रघुनाथ पोस्टुरे, समाजसेवक

रुग्ण ४ वाजता देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्रात आला होता. महिनाभरात ३ वेळा डॉक्टरांना भेटल्या. परवा त्या ४ वाजता दवाखान्यात गेल्या; परंतु त्यांना दम लागत होता, अंगाला सूज होती म्हणून त्यांना पुढील तपासासाठी मंडणगड ग्रामीण रुग्णालयात पाठवले. तेथे सोय नाही, सिझर करावे लागणार होते. त्यांना आकडी येत होती. मध्येच बेशुद्ध होत होत्या. त्यामुळे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी दापोलीला पाठवले. तिथे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत; परंतु दापोलीत पोहचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. १०२ आणि १०८ रुग्णवाहिका मिळण्यास विलंब झाला; परंतु त्यामध्ये डॉक्टरांची चुकी आहे असे नाही. विलंबाबद्दल रुग्णावाहिकांच्या चालकांवर कारवाईचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.

- भास्कर जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.