दहिवडी : ‘‘मी बारामतीशी, फलटणशी तडजोड केली असती, तर माझा राजकारणातील संघर्ष, त्रास कमी झाला असता. मात्र माण-खटावच्या जनतेला स्वाभिमानाने उभं करू शकलो नसतो, पाणी देऊ शकलो नसतो. त्यामुळे माण-खटावच्या मातीचा सुपुत्र कधी झुकला नाही, कधी वाकला नाही,’’ असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
माणच्या ३२ गावांना वरदायी ठरलेल्या गुरुवर्य (कै.) लक्ष्मणराव इनामदार जिहे- कठापूर योजनेची वाढीव योजना आंधळी उपसा सिंचन योजनेला मोठ्या प्रमाणात निधी मिळवून ती योजना विक्रमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल मार्डी जिल्हा परिषद गटाच्या वतीने रांजणी (ता. माण) येथे आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
या वेळी माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन काळे, भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य डॉ. संदीप पोळ, श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण गोरे, श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे संचालक संजय गांधी, माजी सभापती अतुल जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती माणचे सभापती विलासराव देशमुख, राजू पोळ, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव शिंदे, आंधळीचे सरपंच दादासाहेब काळे, डॉ. प्रमोद गावडे, डॉ. बाबासाहेब दोलताडे, भाजप म्हसवड मंडल अध्यक्ष प्रशांत गोरड, माण दहिवडी मंडल अध्यक्ष गणेश सत्रे, सातारा जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, सोहेल शेख, स्वप्नील मोरे, रांजणीच्या सरपंच अर्चना देवकते, उत्तम ढवळे, शंकर दोलताडे, सोपान नारनवर, आप्पासाहेब पुकळे, विशाल घोरपडे, विजय धट, डॉ. वसंत मासाळ, अकील काझी, काकासाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्याचे आयुष्य जास्त असते...
मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. मंत्री गोरे म्हणाले, ‘‘षडयंत्र करणारा शकुनी मामा कधीही जिंकला नाही, मग फलटणचा शकुनी सुद्धा जिंकणार नाही. मी संपलो नाही, मात्र मला संपवता संपवता त्यांना संपावे लागलं. त्यांना घरी बसावं लागलं. माझी बाजू सत्याची होती मी संघर्ष केला. सत्याचे आयुष्य जास्त असते. त्यामुळेच मी स्वाभिमानाने उभा आहे. जिल्हा परिषद सदस्य होताना संघर्ष केला. त्यानंतर आमदार झालो संघर्ष केला. एकही वेळ अशी नाही की मी संघर्ष केला नाही. त्यामुळं परमेश्वराने सर्व गोष्टींवर मार्ग काढून दिला आहे.’’
आता अनेकांना काळजी आहे, अनेकांनी केसमध्ये नाव आहे की नाही माहिती नसताना जामीन घेऊन ठेवले. जयकुमार गोरे कधीही चुकीची कारवाई कोणावर करणार नाही. सत्ता असली किंवा नसली तरी कोणाच्या वाळक्या पाचोळ्यावर पाय देणार नाही.
- मंत्री जयकुमार गोरे.