सोलापूर : नोकरीला लागून १२ वर्षे सेवा पूर्ण झाल्यावर शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मिळते आणि २४ वर्षानंतर निवड वेतनश्रेणी मिळते. त्यातून संबंधित शिक्षकांचा ग्रेड पे वाढतो. साधारणत: १५ मे ते १५ जून या एका महिन्यांत राज्यातील ४० हजारांहून अधिक शिक्षकांचे एकाचवेळी प्रशिक्षण पार पडणार आहे. सर्वांनी व्यवस्थितपणे गैरहजर न राहता प्रशिक्षण घ्यावे म्हणून आता प्रत्येक तासाला प्रशिक्षणार्थींची उपस्थिती नोंदविली जाणार आहे.
मागील दोन वर्षांपर्यंत निवड व वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेतले जात होते. पण, अनेकजण नाममात्र उपस्थिती नोंदवत होते. पण, आता संपूर्ण महाराष्ट्रात एकाचवेळी ऑफलाइन पद्धतीने प्रशिक्षण घेतले जाणार आहे. प्रशिक्षणार्थींचे प्रत्येक तासाला उपस्थिती नोंदवून त्यांनी स्वाक्षरी केलेला रिपोर्ट राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला (एससीईआरटी) पाठविला जाणार आहे. प्रत्येक तासानंतर त्यातील मुद्द्यांवर १० गुणांची वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित चाचणी होईल. तासाचे प्रशिक्षण झाल्यानंतर लगेचच त्याची लिंक ‘एससीईआरटी’कडून संबंधित शिक्षकांना जाईल. त्यांनी ती चाचणी सोडवून ऑनलाइन सबमिट केल्यानंतर अर्ध्या तासात त्यांना त्याचे गुण समजणार आहेत. त्यानंतर स्वाध्याय, कृती संशोधन अशा प्रत्येक घटकासाठी ५० टक्के गुण अपेक्षित आहेत.
तत्पूर्वी, प्रशिक्षणासाठी उपस्थित शिक्षकांची स्वाक्षरीसह उपस्थिती ‘एससीईआरटी’च्या लिंकवर प्रत्येक तासानंतर अपलोड केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक शिक्षकास त्यासाठी उपस्थित राहावेच लागणार आहे. प्रशिक्षण यशस्वी पूर्ण करणाऱ्यांना शेवटी ‘एससीईआरटी’कडून प्रमाणपत्रे दिली जातील. त्यानंतर संबंधित पात्र शिक्षकांना वेतनश्रेणी लागू होईल.
‘एससीईआरटी’कडून प्रशिक्षणाचे नियोजन
सोलापूर जिल्ह्यातील १००७ शिक्षकांनी वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी तर ९५७ शिक्षकांनी निवड वेतनश्रेणीसाठी, अशा एकूण एक हजार ९६४ शिक्षकांनी अर्ज केले आहेत. राज्यभरात या शिक्षकांचे प्रशिक्षण एकाचवेळी सुरू होईल. १५ जूनपूर्वी सर्वांचेच प्रशिक्षण संपणार असून त्याचे नियोजन ‘एससीईआरटी’कडून झाले आहे.
- जितेंद्र साळुंखे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सोलापूर
ठळक बाबी...
चार दिवसांची जिल्हास्तरीय कार्यशाळा पहिल्यांदा होईल. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील प्रशिक्षणार्थींची संख्या पाहून प्रशिक्षणाचे नियोजन
वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवडश्रेणीचे वर्ग स्वतंत्र असतील; दररोज चार तास असे दहा दिवस चालणार प्रशिक्षण
३० पेक्षा कमी प्रशिक्षणार्थी असतील त्या तालुक्यातील शिक्षकांचे प्रशिक्षण शेजारील तालुक्यात होईल. कोणाचीही गैरसोय होणार नाही, याची खबरदारी ‘डायट’कडे
४० ते ६० शिक्षकांचा असणार एक वर्ग; चार तज्ज्ञ करणार मार्गदर्शन
प्रशिक्षणार्थींची लेखी चाचणी, स्वाध्याय, कृती संशोधन ही कामे करून घेण्यासाठी प्रत्येक वर्गात असणार चार तज्ज्ञ