भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम जाहीर झाल्यानंतर आता सर्व गोष्टी पूर्वपदावर येत आहेत. दोन्ही देशांमधील तणावामुळे अनेक स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. याचा परिणाम क्रिकेट स्पर्धांवर झाला होता. मात्र आता सर्व सुरळीत झाल्यानंतर या स्पर्धेचं पुन्हा आयोजन केलं जाणार आहे. बीसीसीआयने 12 मे रोजी आयपीएलच्या 18 व्या मोसमातील उर्वरित सामन्यांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं. बीसीसीआयने 17 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं. यामध्ये प्लेऑफमधील 4 सामन्यांचा समावेश आहे. त्यानुसार 17 ते 27 मे दरम्यान साखळी फेरीतील सामने खेळवण्यात येतील. तर 29 मे ते 3 जून दरम्यान प्लेऑफचा थरार रंगणार आहे.
मुंबई इंडियन्सने या मोसमात आतापर्यंत एकूण 12 सामने खेळले आहेत. मुंबईने 12 पैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवला. मुंबईची या मोसमात निराशाजनक सुरुवात झाली होती. मुंबईला पहिल्या 5 पैकी 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. मात्र त्यानंतर मुंबईने जोरदार कमबॅक केलं. मुंबईने सलग 6 सामने जिंकत प्लेऑफचा दावा मजबूत केला. मात्र गुजरातने मुंबईचा विजय रथ रोखला. मुंबईने गुजरातला 156 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पावसाने 2 वेळा खोडा घातल्याने गुजरातला 19 ओव्हरमध्ये 147 धावांचं सुधारित आव्हान मिळालं होतं. मुंबईने या धावंचा शेवटच्या ओव्हरपर्यंत बचाव केला. मात्र गुजरातने शेवटच्या बॉलवर विजय मिळवत मुंबई इंडियन्स टीमवर मात केली.
मुंबई इंडियन्सचे या 18 व्या मोसमातील 2 सामने शेष आहेत. मुंबई या मोसमातील उर्वरित 2 सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिट्ल्स आणि पंजाब किंग्स विरुद्ध भिडणार आहे. मुंबई दिल्ली विरुद्ध वानखेडे स्टेडियममध्ये भिडणार आहे. तर पलटण साखळी फेरीतील शेवटचा सामना हा पंजाब विरुद्ध जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये खेळणार आहे.
मुंबई इंडियन्ससाठी दोन्ही सामने हे अटीतटीचे आणि ‘करो या मरो’ असे आहेत. कारण दिल्ली आणि पंजाब हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. तसेच अद्याप एकही संघ प्लेऑफसाठी क्वालिफाय झालेला नाही. त्यामुळे इथून एकही चूक प्लेऑफचमध्ये पोहचण्याचं स्वप्न भंग करु शकते. अशात पलटणला या सामन्यात दमदार कामगिरी करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे पलटणच्या कामगिरीकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.