Kalyan Crime News: कल्याण पूर्वेतील एका नामांकित खाजगी शाळेतील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेचे संचालकांचा अश्लील व्हिडीओ समाज माध्यमातून व्हायरल झाले आहेत. या प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक संतप्त झाले आहेत.
पालकांनी थेट कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठत संबंधित संचालका विरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. याप्रकरणी शाळा कमिटीवरील संचालक सदस्य महेश गायकवाड यांनी देखील याप्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
कल्याण पूर्वेतील एका नामांकित शाळेतील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेतील संचालकांचा अश्लील व्हिडिओ समोर आला आहे. अनेक दिवसांपासून हे प्रकार सुरू असून केवळ एखादा प्रकार नाही तर असे तीन ते चार व्हिडिओ समोर आले आहेत. हे व्हिडिओ समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. यापूर्वी देखील शाळेच्या परिसरात कुटुंब नियोजन साधने देखील आढळून आली आहेत.
हे व्हिडिओ समोर आल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही संतप्त पालकांनी याची माहिती ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आशा रसाळ यांना दिली. रसाळ यांनी काही पालकांसह शाळेवर धडक देत शाळा प्रशासनाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. याची शिक्षण मंडळाकडेही तक्रार करून कारवाईची मागणी करू असे सांगितले.
शाळेच्या कार्यलयातील या संचालकांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक पालकांनी थेट कोळशेवाडी ठाणे गाठले आणि संबंधित संचालकाविरोधात तक्रार अर्ज दाखल करत याची चौकशी करण्याची मागणी केली. शाळा ही विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि संस्काराचे ठिकाण असते, आणि अशा ठिकाणी अश्लीलता समोर येणे हे अतिशय लाजीरवाणं असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.
याप्रकरणी कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांना विचारले असता ते म्हणाले, याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसून याची चौकशी सुरू आहे. शाळेच्या कमिटी मधील संचालक सदस्य महेश गायकवाड म्हणाले, शाळेचे संचालक व संबंधित महिला या दोघांवर यापूर्वी ही गुन्हे दाखल आहेत. त्यांचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल झाले आहेत. पोलिसांनी तसेच शिक्षण मंडळाने याची चौकशी करून संबंधितांविरोधात कारवाई करत गुन्हा दाखल करावा, मी देखील अनेकदा तक्रारी केल्या आहेत असे सांगितले.