लोकअदालतीत एक हजार प्रकरणाचा निपटरा
कल्याण, ता. १३ ( वार्ताहर) : कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेले ग्राहक तसेच वीजबिलाबाबत वाद आणि वीजचोरीच्या दाखलपूर्व व प्रलंबित अशा एक हजार १४९ प्रकरणांचा तडजोडीने निपटारा केला आहे. तालुका न्यायालय स्तरावर १० मे रोजी आयोजित लोकअदालतीत या ग्राहकांनी सहभाग नोंदवून तीन कोटी ३९ लाखांचा भरणा करून प्रकरणे सामोपचाराने मिटवली.
कल्याण मंडल एक अंतर्गत डोंबिवली, कल्याण पश्चिम व पूर्व विभागात १९६ ग्राहकांनी ७८ लाख ३६ हजार रुपयांचा भरणा करून आपल्या प्रकरणांचा निपटारा केला, तर कल्याण मंडल दोन अंतर्गत उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर, मुरबाड भागातील एक कोटी ८४ लाख रुपयांचा भरणा करणाऱ्या ४२७ ग्राहकांची प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यात आली. वसई मंडलांतर्गत वसई, विरार, वाडा, सफाळे येथील ४६० ग्राहकांनी लोकअदालतीत सहभागी होत ७३ लाख ३७ हजार रुपयांचा भरणा केला, तर पालघर मंडल कार्यालयांतर्गत पालघर, बोईसर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा येथील ६६ ग्राहकांनी तीन लाख ३३ हजार रुपये भरून आपली प्रकरणे निकाली काढली.
लोकअदालत यशस्वी होण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणासह मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा, अधीक्षक अभियंते कार्यकारी व उपविभागीय अभियंते, विधी विभागाने विशेष प्रयत्न केले.