सुनील पाटील
कोल्हापूर : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात ४५ हजार घरकुले मंजूर झाली आहेत. त्यानुसार ६७ कोटी रुपयांचा पहिला हप्ता लाभार्थांच्या बँक खात्यावर जमा झाला आहे. दरम्यान, पहिला हप्ता जमा होऊन अडीच महिने उलटले तरीही जिल्ह्यातील ३६ हजार लाभार्थ्यांनी अजूनही घरकुलाची पायाखोदाईही केली नसल्याचे चित्र आहे.
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेतून सर्वांना घरे दिली जात आहेत. देशात २०१६-१७ पासून ही योजना सुरू आहे. यामध्ये, २०१६-१७ ते २०२१-२२ पर्यंत कोल्हापूर जिल्ह्याला १६ हजार ६०० चे उद्दिष्ट होते. हे उद्दिष्ट ९५ टक्के पूर्ण झाले आहे. लाभार्थ्यांना घरकुले दिली आहेत. दरम्यान, २०१८ च्या सर्व्हेनुसार जिल्ह्यातील ७० हजार लाभार्थी पात्र ठरले आहेत. यामध्ये २०२२-२३ मध्ये चार हजार आणि २०२४-२५ मध्ये ४१ हजार ६०० असे एकूण ४५ हजार ६०० घरे मंजूर झाली आहेत. या सर्वांना २२ फेब्रुवारीला पहिला पंधरा हजार रुपयांचा हप्ता बँक खात्यावर जमा केला आहे. दरम्यान, जिल्ह्यात ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या पातळीवर २० दिवसांत ९२ टक्के घरे मंजूर केली आहेत.
लाभार्थ्यांकडूनही घर बांधणी सुरू होईल, अशी अपेक्षा होती. पहिला हप्ता मिळाल्यानंतर तत्काळ घर बांधणीला सुरुवात करायची होती. यासाठी जिल्हा परिषदेकडून घरकुल कसे असावे, यासाठी आराखडा तयार करून दिला आहे. घरकुल लाभार्थ्यांसाठी चार हप्ते दिले जाणार आहेत. यामध्ये पहिला हप्ता कधी आणि शेवटचा हप्ता कधी याचे नियोजन केले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ३५ हजार लाभार्थ्यांनी पहिला हप्ता मिळूनही घर बांधणीचा मुहूर्त शोधलेला दिसत नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून एक लाख ५८ हजार आणि महाराष्ट्र शासनाकडून ५० हजार रुपये अनुदान असलेल्या या योजनेतील पुढील हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी हालचाल करणे गरजेचे आहे.
...
तालुका* बांधकाम सुरू असलेले लाभार्थी
आजरा* ४४३
गगनबावडा* ८६
भुदरगड* ८२२
चंदगड* ३८१
गडहिंग्लज* ८९३
हातकणंगले* ४५०
कागल* १६२३
करवीर* ९२२
पन्हाळा* ८१२
राधानगरी* ८५८
शाहूवाडी* ६७५
शिरोळ* ८९६
‘कोल्हापूर जिल्ह्यातील गोरगरीब लोकांना घरकुल योजनेतून लाभ देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. लोकांनी लवकरात लवकर पहिला टप्पा पूर्ण करून अनुदानाची मागणी करावी.
: सुषमा देसाई, संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प