विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीची इनसाइड स्टोरी, दिग्गज खेळाडूने सर्वकाही केलं उघड
GH News May 14, 2025 07:10 PM

विराट कोहलीने इंग्लंड दौऱ्यापूर्वी अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे. रोहित शर्मानंतर विराट कोहलीने निवृत्तीचा निर्णय घेतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. विराट कोहलीचा फिटनेस पाहता तो आरामात दोन तीन वर्षे कसोटी खेळू शकला असता. पण त्याने कसोटीला रामराम ठोकल्याने क्रिकेट तज्ज्ञ वेगवेगळी मतं मांडत आहेत. पण विराट कोहलीने कसोटी क्रिकेटपासून दूर होण्याचं नेमकं कारण कोणालाच माहिती नाही. आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू मार्क टेलर आपलं मत मांडलं आहे. त्याने विराट कोहलीच्या निवृत्तीमागची इनसाईड स्टोरी सांगितली आहे. मार्क टेलरच्या मते, विराट कोहली मागच्या वर्षांपासून या फॉर्मेटमध्ये संघर्ष करत होता. त्यामुळे रागात होता आणि हळू हळू त्याचं स्वरूप अधिक तीव्र झालं. याची झलक ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत पाहायला मिळाली होती. त्यामुळे त्याने घेतलेला निर्णय योग्य आहे.

कोहलीच्या निर्णयावर टेलरने काय सांगितलं?

मार्क टेलरने सांगितलं की, ‘विराट आता 36 वर्षांचा आहे. प्रामाणिकपणे सांगायचं तर मागची तीन चार वर्षे त्याच्यासाठी चांगली नव्हती. मला वाटतं की त्याने मागच्या पाच वर्षात जवळपास 300 धावा केल्या. तो त्याच्या सर्वश्रेष्ठ फॉर्ममध्ये नाही किंवा विराट कोहलीने मागच्या 10 वर्षात जे काही करत होता ते होत नाही. विराट कोहली दशकातील सर्वोत्तम कसोटी खेळाडूंपैकी एक आहे यात काही शंका नाही. पण मागच्या समरमध्ये एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे त्याची आक्रमकता.. विराट कोहलीच्या बाबतीत मला ही गोष्ट सर्वाधिक आवडते. मी कायम विराट कोहलीचा चाहता राहिलो आहे. पण त्याची आक्रमकता रागात बदलली होती. जेव्हा मी सॅम कोन्टासला मारलेला धक्का पाहीला तेव्हा मला वाटलं की ही चिंता करणारी गोष्ट आहे.’

मार्क टेलरने पुढे सांगितलं की, ‘जेव्हा आक्रमकता रागात बदलते तेव्हा ते खूप चिंताजनक संकेत असतात. तेव्हा समजून जायचं की आता दूर होण्याची वेळ आली आहे. यासाठी मला वाटतं की,विराटसाठी ही योग्य वेळ आहे. भारतीय क्रिकेटसाठी आवश्यक नाही, कारण ते रोहित आणि विराटला एकत्र गमावतील. पण प्रत्येक चांगल्या गोष्टीचा अंत झाला पाहिजे. म्हणून ते पूर्णपणे संपण्यापूर्वीच बाहेर पडा.’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.