अवकाळी पावसाचा 'महावितरण'ला २६ लाखांचा दणका! वाऱ्याने कोसळले ७७५ विजेचे खांब; १८.८८ किमी अंतरावरील ताराही तुटल्या, ११० गावांची रात्र अंधारात
esakal May 15, 2025 07:45 AM

सोलापूर : वाऱ्यासह अवकाळी पावसाने बुधवारी (ता. १३) सायंकाळी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ७७५ विजेचे खांब कोसळले. तर १८.८८ किलोमीटर अंतराच्या तारा तुटल्या. त्यामुळे महावितरणचे नुकसान झाले. तर ११० गावे अंधारात बुडाली. या गावांतील वीजपुरवठा गुरुवारी सुरू झाला आहे.

बुधवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. या वाऱ्यामुळे उच्चदाब वाहिनीच्या ३०६ तर लघुदाब वाहिनीच्या ४६९ खांब कोसळल्या. त्यामुळे महावितरणचे अनुक्रमे १२ लाख ५७ हजार व १३ लाख ६६ हजारांचे नुकसान झाले. परिणामी २० उपकेंद्रांसह पाच हजार ११३ ट्रान्सफॉर्मर्स बंद पडल्याने ११० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच शेतीचाही वीजपुरवठा बंद पडला.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बिघाड शोधून दुरुस्तीची कामे सुरू केली. गुरुवारी दुरुस्तीची कामे व दुसऱ्या उपकेंद्रातून व दुसऱ्या फिडरवरुन वीजपुरवठा सुरू केला. त्यामुळे ११० गावांतील वीजपुरवठा सुरू झाला. दरम्यान, रात्रभर वीजपुरवठा बंद झाल्याने नागरिकांचे हाल झाले.

मोहोळ, पंढरपूरमध्ये सर्वाधिक खांब कोसळले

माळशिरस, करमाळा, माढा वगळता अन्य तालुक्यात विजेचे खांब कोसळले. मोहोळ व पंढरपूर तालुक्यात याचे सर्वाधिक प्रमाण होते. अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, मंगळवेढा व सांगोला तालुक्यातही खांब कोसळले.

----------------------------------------------------------------------------------------

‘या’मुळे वीजपुरवठा होता अनेक तास खंडित

वाऱ्यामुळे तारा तुटल्या. झाडे व झाडांच्या फांद्या तुटून वीजतारांवर कोसळल्याने त्या तुटल्या. तर वीज कोसळल्यानेही उपकेंद्रात बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित झाला. ओव्हरहेड लाईनच्या १८.८८ किलोमीटर अंतराच्या तारा तुटल्या.

शेतीचा वीजपुरवठाही बंद

गुरुवारी दिवसभर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीची कामे केली. नऊ ट्रान्स्फॉर्मरची कामे राहिली आहेत. त्यावरील शेतीचा वीजपुरवठा गुरुवारी रात्रीपर्यंत बंद होता. त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू असून तातडीने वीजपुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

------------------------------------------------------------------------------------

काही ठिकाणी शेतीचा वीजपुरवठा खंडित झाला आहे

बुधवारी सायंकाळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेचे खांब कोसळले. गुरुवारी सर्व ११० गावांतील वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. लघुदाब वाहिनीचे खांब उभारण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी शेतीचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. तेही ट्रान्सफॉर्मर्स सुरू करून तातडीने शेतीचा वीजपुरवठा पूर्ववत केला जाईल.

- सुनील माने, अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.