आयपीएल 2025 स्पर्धेत गुजरात टायटन्स जबरदस्त कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्स 16 गुणांसह गुणतालिकेत टॉपला आहे. त्यामुळे यावेळी जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. असं असताना या स्पर्धेच्या बाद फेरीआधी गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. स्पर्धेत 500 धावा ठोकणाऱ्या विकेटकीपर फलंदाज जोस बटलर प्लेऑफचे सामने खेळणार नाही हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सची धाकधूक वाढली आहे. गुजरातची फलंदाजी आघाडीच्या 3 फलंदाजांवर अवलंबून असल्याचं दिसून आलं आहे. बटलरव्यतिरिक्त शुबमन गिल आणि साई सुदर्शनने 500 हून अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे बटलरच्या गैरहजेरीत प्लेऑफचे सामन्यात तग धरणं कठीण आहे. त्यात संघाकडे विकेटकीपिंगचा पर्यायही मर्यादीत आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सची ऐनवेळी धावाधाव सुरु झाली आहे. गुजरात टायटन्सने तात्पुरत्या स्वरुपात बटलरचा पर्याय शोधला आहे. श्रीलंकेचा विकेटकीपर फलंदाज कुसल मेंडिसला संघात जागा दिली आहे.
जोस बटलरच्या जागी कुसल मेंडिसला थेट प्लेइंग 11 मध्ये जागा मिळण्याची शक्यता आहे. कारण विकेटकीपिंगसाठी शुबमन गिलकडे अनकॅप्ड अनुज रावतचा एकमात्र पर्याय आहे. अशा स्थितीत कुसल मेंडिस हाच चांगला पर्याय ठरू शकतो. मेंडिस नुकताच पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत खेळला होता. क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून 168 हून अधिक स्ट्राईक रेटने 143 धावा केल्या होत्या. 18 मे रोजी मुल्तान सुल्तान्स आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यासाठी संघात कुसल मेंडिसचं नाव आहे. त्यात पाकिस्तान प्रीमियर लीग स्पर्धा 25 मे रोजी संपणार आहे. तर आयपीएलच्या प्लेऑफचे सामने 29 मे पासून होणार आहेत. त्यामुळे दोन्ही लीग स्पर्धेत खेळण्याचा मान कुसल मेंडिसला मिळणार आहे.
30 वर्षीय कुसल मेंडिसने आपल्या टी20 करिअरमध्ये दोन शतकं आणि 32 अर्धशतकं ठोकली आहेत. तसेच 4700 हून अधिक धावा केल्या आहेत कुसल मेंडिसला आयपीएल खेळण्यासाठी पहिल्यांदा साइन केलं गेलं आहे. बीसीसीआयने भारत पाकिस्तान तणावपूर्ण स्थितीत रिप्लेसमेंट पॉलिसी बदलली आहे. पण बदललेल्या खेळाडूंना फक्त उर्वरित सामन्यातच खेळता येणार आहे. त्यामुळे कुसल मेंडिस भले चांगला खेळला तर त्याला पुढच्या पर्वासाठी रिटेन करता येणार नाही.