ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान आर अश्विनने निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर पाचव्या कसोटीत रोहित शर्माने ( ) खराब कामगिरीमुळे स्वतःला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवले. एडिलेड कसोटीनंतरच रोहितचे कर्णधारपद जाणार होते, परंतु हिटमॅनने स्वतःला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवून 'आजचे मरण' टाळले. पण, त्याचवेळी त्याच्या कसोटीतून निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या की त्या मुद्दाम पसरवल्या गेल्या होत्या? आता हाती आलेल्या वृत्तानुसार मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याला टीम इंडियावर फुल कंट्रोल हवा आहे आणि त्यामुळेच तो त्याच्या मार्गातील अडथळे दूर करतोय, अशी चर्चा आहे.
रोहित शर्मा व विराट कोहली यांनी मागील आठवड्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि गंभीरचा रस्ता मोकळाच झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( ) दैनंदिन कामकाजात गंभीरला महत्त्वाचा हक्क हवा आहे आणि तशी मागणी त्याने केली आहे. गंभीरची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर टीम इंडिया घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून ०-३ अशी हरली आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील ३-१ अशा पराभवामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळण्याची संधीही गमावली गेली.
रोहित व विराट यांच्या निवृत्तीमागे निवड समिती व गंभीरचा हात असल्याची चर्चा आहे. अजित आगरकर व गंभीर यांना भविष्याचा विचार करून सूत्र हलावयची होती. इंग्लंड दौऱ्यासाठीच्या संघ निवडीपूर्वी रोहित व विराटची निवृत्ती बरंच काही सांगून जाणारी आहे. शुभमन गिल हा टीम इंडियाच्या कसोटी संघाचा नवा कर्णधार म्हणून पुढे येत आहे, तर जसप्रीत बुमराही या शर्यतीत आहे.
दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, संघ निवड, धोरणात्मक नियोजन आणि संघाशी संबंधित इतर निर्णयांच्या बाबतीत गौतम गंभीर निर्णय घेण्याची शक्यता आहे, कारण त्याच्या निर्णयांना आव्हान देणारा कोणीही उरलेला नाही. भारतीय मुख्य प्रशिक्षकाकडे कर्णधारापेक्षा जास्त अधिकार असण्याची ही पहिलीच घटना असेल.
न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेतील पराभव आणि ऑस्ट्रेलियातील पराभवाची पुनरावृत्ती थांबवण्यासाठी, गंभीरने बोर्डाला पूर्ण स्वायत्ततेची विनंती केली आहे, असे अहवालात म्हटले आहे. त्यात असेही म्हटले आहे की, गंभीरला शुभमन गिल कर्णधार हवा आहे, जो अजूनही तरुण असल्याने गंभीरच्या निर्णयांना आव्हान देऊ शकणार नाही. जसप्रीत बुमराह हा सध्याच्या संघातील त्याला आव्हान देणारा एकमेव खेळाडू आहे.
बुमराह हा रोहितच्या कसोटी संघाचा उपकर्णधार होता आणि हिटमॅनच्या निवृत्तीनंतर त्याच्याकडे कर्णधारपद जाणे अपेक्षित आहे. पण, गंभीर तसे होऊ देणार नाही, हेही वृत्तात म्हटले आहे.