भिवंडी, ता. १५ (वार्ताहर)ः लहान मुलांच्या क्षुल्लक भांडणातून बाप-लेकाने शेजाऱ्याला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. शांतिनगर परिसरातील न्यू आझादनगरमध्ये बुधवारी सायंकाळी ही घटना घडली होती. याप्रकरणी शांतिनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
शांतिनगर हद्दीतील न्यू आझादनगर येथील निजामी हॉटेलजवळ राहणारे मुस्ताक अन्सारी, साहील अन्सारी यांनी इस्लामुद्दीन अन्सारी (३६) यांना जबर मारहाण केली आहे. बुधवारी सायंकाळी ६ च्या सुमारास मुस्ताक आणि इस्लामुद्दीन यांची मुले एकत्र खेळत होती. त्या वेळी मुलामुलांमध्ये किरकोळ भांडणावरून वाद झाला. याच वादातून साहिलने इस्लामुद्दीन आणि त्याच्या पत्नीला शिवीगाळ केली. बाचाबाची सुरू असताना मुस्ताकनेही इस्लामुद्दीनला शिवीगाळ केली. भांडण सुरू असताना साहिलने घरातील लोखंडी पाइपने इस्लामुद्दीनच्या डोक्यात मारले. मुस्ताकनेही हाताच्या ठोशा बुक्क्यांनी मारहाण करून इस्लामुद्दीनला गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी शांतिनगर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे.