कल्याण-डोंबिवलीत क्रीडा सुविधांची वाणवा
esakal May 16, 2025 01:45 AM

कल्याण-डोंबिवलीत क्रीडा सुविधांची वानवा
संकेत सबनीस; सकाळ वृत्तसेवा
कल्याण, ता. १५ : कल्याण-डोंबिवली महापालिका स्मार्ट सिटीत क्रीडा क्षेत्र स्मार्ट होणार का? असा सवाल कल्याण-डोंबिवलीतील खेळाडू, क्रीडा शिक्षक आणि क्रीडा महासंघाचे प्रतिनिधी महापालिकेला विचारत आहेत. महापालिका क्षेत्रात चांगल्या क्रीडा सुविधा निर्माण व्हाव्यात, अत्यावशक पायाभूत सोयी निर्माण कराव्यात, तसेच सध्याच्या क्रीडाविषयक समस्या सोडवाव्यात अशी मागणी क्रीडा क्षेत्रांतून सातत्याने होत आहे; मात्र यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांना भेटीसाठी वेळ मागूनही मिळत नसल्याची खंत ठाणे जिल्हा एकविध क्रीडा महासंघाने व्यक्त केली आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरांत कुस्ती, जिम्नॅस्टिक्स, वेटलिफ्टिंग, कबड्डी, तलवारबाजी, पॉवरलिफ्टिंग, आट्यापाट्या, कॅरम या खेळांत खेळाडू, मार्गदर्शक व संघटक पुरस्कार प्राप्त झालेले अनेक कनिष्ठ व ज्येष्ठ खेळाडू आहेत. तसेच अनेक खेळाडू हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले आहेत. असे क्रीडा क्षेत्राला पोषक वातावरण असतानाही असुविधांमुळे क्रीडा प्रशिक्षक आणि खेळाडूंची आबाळ होत आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील क्रीडाविषयक सुधारणा अत्यावश्यक आहेत, या विषयाच्या अनुषंगाने ठाणे जिल्हा एकविध क्रीडा महासंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष मुकुंद भोईर, सचिव मालोजी भोसले यांनी महापालिका आयुक्तांना २३ एप्रिल रोजी पत्र दिले. या विषयावर चर्चा करण्यासाठी महासंघाने आयुक्तांची भेट मागितली, परंतु आयुक्त अभिनव गोयल यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेचा पदभार नव्याने स्वीकारल्यामुळे क्रीडा विभागाचा आढावा घेऊन चर्चेसाठी बोलावण्यात येईल, असे आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले आहे.

महापालिकेची क्रीडा समितीच नाही
शालेय क्रीडा स्पर्धांसाठी महापालिकेला जिल्ह्याचा दर्जा प्राप्त झाला आहे. प्रतिवर्षी शालेय क्रीडा स्पर्धांचे नियोजन क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात येते. राज्य सरकारच्या २००३ च्या शासन निर्णयानुसार क्रीडा समिती स्थापन करणे आवश्यक आहे, परंतु कल्याण-डोंबिवली महापालिकेने क्रीडा समिती तयार केलेली नाही. त्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धांचे नियोजन मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षकांना विचारात न घेता मनमानी पद्धतीने करण्यात येते, अशी क्रीडा शिक्षकांची तक्रार असल्याचे समन्वयक अंकुर आहेर यांनी स्पष्ट केले.

मैदानांवर फक्त जत्राच
प्रतिवर्षी शालेय क्रीडा स्पर्धा महापालिकेचा क्रीडा विभाग घेतो. बहुतांश क्रीडा स्पर्धा महापालिकेचा क्रीडांगणासाठी आरक्षित भूखंडावर घेतल्या जातात. कल्याण पश्चिमेला सुभाष मैदान, यशवंतराव चव्हाण क्रीडांगण, फडके मैदान व नानासाहेब धर्माधिकारी मैदान, कल्याण पूर्वेला एकमेव दादासाहेब गायकवाड मैदान, डोंबिवली पश्चिमेला एकमेव भागशाळा मैदान आणि डोंबिवली पूर्वेला एकमेव सावळाराम महाराज क्रीडा संकुल इतके क्रीडांगणासाठी आरक्षित भूखंड आहेत. या मैदानांवर खेळाडूंना अत्यावश्यक पायाभूत सुविधांचा अभाव आहे. या मैदानांवर विविध महोत्सव व जत्रा भरवल्या जातात.

महिला खेळाडूंची आबाळ
वास्तविक खेळाडू हा केंद्रबिंदू मानून घेतल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये महिला खेळाडूंना कपडे बदलण्यासाठी सुरक्षित बंदिस्त खोली, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि स्वच्छतागृह या सुविधा उपलब्ध नसल्याची खंत अंकुर आहेर यांनी बोलून दाखवली.

ठाणे जिल्ह्यातील ५३ अधिकृत शासनमान्य तसेच महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनची मान्यता असणाऱ्या राज्य एकविध संघटनेला संलग्न असलेल्या ठाणे जिल्ह्यातील एकविध क्रीडा संघटनांनी, ठाणे जिल्हा एकविध क्रीडा महासंघाची स्थापना केली. ठाणे जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण खेळाडू तयार व्हावेत, २०३६ च्या ऑलिंपिकमध्ये ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू तयार व्हावे, या उद्देशाने महासंघाची स्थापना केली. या उद्देशासाठी महापालिका आयुक्तांनी क्रीडा क्षेत्रातील समस्यांकडे लक्ष द्यावे.
-आप्पासाहेब शिंदे अध्यक्ष, ठाणे जिल्हा एकविध क्रीडा महासंघ

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.