गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी त्यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात केला आहे. हे पुस्तक राऊतांच्या ईडी कोठडी आणि आर्थर रोड जेल कारावासातल्या एकूण अनुभवासंदर्भातील आहे. शनिवारी या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मुंबईत पार पडणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, जावेद अख्तर, साकेत गोखले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मोदी आणि शाहांची कशाप्रकारे मदत केली होती, याचा सविस्तर घटनाक्रम या पुस्तकात मांडला आहे.
नरेंद्र मोदी हे गुजरात दंगलीप्रकरणी एक आरोपी होते. तसंच अमित शाह हे एका खूनप्रकरणी आरोपी होते, त्यावेळेस युपीएचं सरकार होतं. मोदींना दंगलीप्रकरणी अटक करण्यापर्यंतची परिस्थिती होती. पण त्यावेळी शरद पवार यांनी एका कॅबिनेटमध्ये मत मांडलं की राजकीय मतभेद असतील, तरीही लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं योग्य ठरणार नाही, अशी भूमिका पवारांनी मांडली होती. त्यांच्या या भूमिकेला काही सहकाऱ्यांनी मूकसंमती दर्शवली आणि त्यामुळे मोदींची त्यावेळी होणारी अटक टळली, असा खळबळजनक गौप्यस्फोट राऊतांनी या पुस्तकात केला आहे. त्याचप्रमाणे अमित शाह हे एका खून प्रकरणात आरोपी होते, तडीपार होते. सीबीआय चौकशी सुरू होती. तेव्हा मोदींनी शरद पवारांना फोन करून विनंती केली की अमित शाह यांना या प्रकरणात मदत करा. तेव्हा सीबीआय चौकशीत त्या पथकातले महाराष्ट्र कॅडरचे एक अधिकारी होते, त्यांच्याशी संपर्क साधून पवारांनी मदत केली होती, असाही दावा राऊतांनी पुस्तकात केला. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी पुढे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचं किती स्मरण ठेवलं, असा सवाल राऊतांनी आपल्या पुस्तकात केला आहे.
बाळासाहेबांनी केलेली मदत कोणत्याही कायद्याच्या चौकटीत बसत नाही. गुजरातमधून शाह तडीपार होते, सीबीआयने फास आवळता आणल्यामुळे शाहांच्या तात्पुरत्या जामीनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. तेव्हा बाळासाहेब मदत करू शकतात असं शाहांना कुणीतरी सुचवलं होतं. एकेदिवशी भर दुपारी ते लहान जय शाहला घेऊन मुंबई विमानतळावर उतरले. विमानतळावरून काळी-पिवळी टॅक्सी पकडून ते वांद्र्याच्या दिशेने निघाले. शाहांनी ड्रायव्हरला मातोश्रीच्या मुख्य गेटवर सोडायला सांगितलं. मात्र त्यावेळी कलानगरच्या मुख्य गेटवरच शाहांना अडवून ठेवण्यात आलं होतं. गुजरातचा आमदार आणि माजी मंत्री असून साहेबांना तात्काळ भेटायचं आहे, असा निरोप शाहांनी दिला होता. परंतु हा निरोप आत जात नव्हता. कारण त्यावेळी मातोश्रीची सुरक्षा व्यवस्था अनेक अडथळ्यांची होती. दुसऱ्या दिवशी शाह पुन्हा मातोश्रीवर पोहोचले, त्यादिवशी ते मुख्य गेटवरून ड्रम गेटपर्यंत पोहोचू शकले. गुजरातचे एक आमदार त्यांच्या मुलासह आल्याचा निरोप शिवसेनाप्रमुखांपर्यंत पोहोचला. शाहांनी गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा आपल्यासह कुटुंब भोगत असल्याची दर्दभरी कहाणी सांगितली. मी अडचणीत आबे, अमुक अमुक न्यायमूर्तींसमोर केस सुरू आहे. तडीपार आहे वगैरे असं सगळं शाहांनी बाळासाहेबांना सांगितलं. मी काय करू, असा प्रश्न बाळासाहेबांनी शाहांना विचारला. तेव्हा आप बात करेंगे तो न्यायमूर्ती आपकी बात मान लेंगे. तुमचा शब्द ते खाली पडू देणार नाहीत, असं शाह म्हणाले. शाहांकडून विषय समजून घेतल्यानंतर बाळासाहेबांनी एक महत्त्वाचा फोन कुणाला केला (हे सांगणं नैतिकतेला धरून नाही), असं राऊतांनी या पुस्तकात म्हटलंय. अमित शाहांच्या प्रकरणाशी संबंधित व्यक्तीसोबत मनोहर जोशींच्या फोनवरून बाळासाहेब थेट बोलले. तुम्ही कोणत्याही पदावर बसलेले असा, पण तुम्हीही हिंदू आहात हे विसरू नका, हे बाळासाहेबांच्या संवादाचं शेवटचं वाक्य होतं. त्या एका फोनने अमित शाह यांच्या जीवनातल्या आणि राजकीय प्रवासातल्या बहुतेक अडचणी दूर झाल्याचा दावा राऊतांनी केला आहे. या सर्व घडामोडी, घटनाक्रम यांचा उल्लेख पुस्तकात करण्यात आला आहे.
संजय राऊतांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शनिवारी पार पडणार असून यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. राऊतांनी दोन आठवड्यांपूर्वी या पुस्तकाची प्रत शरद पवारांना दिली होती. या पुस्तकातील मजकुराबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचंही कळतंय.