ढिंग टांग : माहायुतिकांन्सेन बुलेट ट्रेन..!
esakal May 16, 2025 12:45 PM

जपानमधील शिनक़ान्सेन बुलेट ट्रेनबद्दल फारसे कोणी ऐकले नसेल. कारण ती काही तितकीशी प्रसिध्द नाही. मुंबई-सुरत प्रस्तावित बुलेट ट्रेनबद्दल थोडे फार ऐकले असेल. कारण ती पुरेशी प्रसिध्द आहे, आणि भविष्यात अफाट लोकप्रियदेखील होणार आहे. पण माहायुतिकान्सेन ट्रेनबद्दल तुम्हाला नक्कीच ठाऊक असेल. कारण ते सर्वांनाच ठाऊक असते.

माहायुतिकान्सेन ही जगातली नव्हे, तर विश्वातली सर्वात विश्वसनीय, सुरक्षित आणि वेगवान बुलेट ट्रेन आहे. या ट्रेनचे नाव बदलावे, अशी मागणी होत आहे, कारण ही बुलेटपेक्षाही अधिक वेगाने धावते असे म्हणतात. जपानची शिंकान्सेन ट्रेन थोडीशी स्लो धावते. या गाडीत बसल्यावर शिंक आल्यास ती पूर्ण होऊन जबडा मिटेपर्यंत गंतव्यस्थानच येते, म्हणून तिचे नाव शिंकान्सेन असे पडले, असे एका जपानी अभियंत्याने वाकवाकून सांगितले.

माहायुतिकान्सेन हा अभियांत्रिकी विश्वातला चमत्कार मानला जातो. इतका की खरेच का हा शोध आपण लावला? असा प्रश्न अभियंत्यांनाच पडतो. या महायुतिकान्सेन बुलेट ट्रेनचे चालक देवेनाका नागापुरा हे आहेत. अतिशय निष्णात चालक!! ज्या स्थानकांवर थांबू नये, तिथेही गाडी थांबवून जोरात पुढे दामटून वेळेत गंतव्यस्थान गाठण्यात त्यांचा हात कोणीही धरु शकणार नाही, आणि कुणी धरतही नाही. त्यांचे धरलेच तर पायच धरावे लागतात.

श्रीमान एकानाता थानामाझा हे त्यांचे ‘को-चालक’ आहेत, देवेनाकासान यांना अर्जंट कुण्या पाशिंजराकडे जायचे असेल तर एकानातासान गाडीचे चाक (पक्षी : स्टिअरिंग व्हील) हाती घेतात. इकडे तिकडे वळवून बघतात. पण महायुतिकान्सेन ट्रेनचे वैशिष्ट्य हे की ती चाकावर कुठे वळतच नाही. तिचे चलनवलन सारे दिल्लीहून रिमोट कंट्रोलद्वारे होते. पण एकानातासान भोळे आहेत.

त्यांना वाटते की आपणच बुलेट ट्रेन चालवत आहोत! त्यांचे आणखी एक सहकारी को-चालक दादाकाका बारामाती हेही बरेच निपुण चालक आहेत. अनेक करामती करतात. एक ना एक दिवस बुलेट ट्रेनचे चाक माझ्याच हातात असेल, अशी महत्त्वाकांक्षा ते बाळगून आहेत. पण अजून संधी मिळालेली नाही. आपल्याला आजही तिकिट काढूनच गाडीत चढावे लागते, याचे त्यांना भारी वैषम्य वाटते.

देवेनाकासान अतिशय विनम्र स्वभावाचे आहेत. गंतव्यस्थान आले की हात जोडून कमरेत वाकत ते उतरणाऱ्या पाशिंजरांना ‘मी पुन्हा येईन’ असे आवर्जून सांगतात. लगेच निघून मूळ ठिकाणी परत गेल्यावर तिथेही तस्सेच सांगतात. माहायुतिकान्सेन बुलेट ट्रेन हा एक अभियांत्रिकी चमत्कार आहे हे वर सांगितले आहेच. या ट्रेनच्या सफरीत सर्व सोयीसुविधा आहेत.

अहोरात्र राष्ट्रीय संगीताचा कार्यक्रम चालू असतो. एकदा या गाडीत चढले की मध्येच उतरता मात्र येत नाही. दरवाजे ऑटोम्याटिकली बंद होतात. खानपान सेवा उत्तम आहे, पण काय खायचे हे पाशिंजराच्या मनावर नसते उदाहरणार्थ, ‘आमलेट किंवा कटलेट लाव’ अशी ऑर्डर पाशिंजराने दिल्यास तेच पुढ्यात येईल, असे नव्हे! फोडणीचा (शिळा) भातही येऊ शकतो किंवा शिरा मागितला तर उपमा आणून दिला जाऊ शकतो. विशेष म्हणजे या जादुई गाडीत कपडेही धुऊन, इस्त्री करुन मिळतात.

अनेक पाशिंजरे मळक्या कपड्यांची गाठोडी काखेत मारुन गाडीत चढतात, आणि उतरताना टेचात, शुभ्र पोशाखात उतरतात!! माहायुतिकान्सेन बुलेट ट्रेनचा वेग हा ध्वनीच्या वेगाच्या चौतीस पट आणि प्रकाशाच्या वेगाच्या एक तृतीयांश आहे, असे शास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे. येत्या पाचेक वर्षात तो प्रकाशवेगाच्या तिप्पट आणि मोक्षवेगाच्या दोन तृतीयांश होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.