Malad Crime: 'परदेशात नोकरी देतो', मुंबईतल्या शंभरहून अधिक बेरोजगारांना गंडवलं, कोट्यवधी रूपये उकळले
Saam TV May 16, 2025 08:45 PM

संजय गडदे, साम टीव्ही

परदेशात उच्चपदस्थ हॉटेलमध्ये नोकरी देण्याचं आमिष दाखवून शंभरहून अधिक बेरोजगार तरुणांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मालाड पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी ‘एचएन ओव्हरसीस’ या नावाने मालाडमध्ये बनावट प्लेसमेंट एजन्सी सुरू करून प्रत्येकी ४ लाख रुपये घेतले. नोकरी न मिळाल्याने अनेक तरुणांची फसवणूक झाली असल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी तिघांविरोधात कोट्यवधींचा गंडा घातल्याचा आरोप आहे.

फसवणुकीचा प्रकार काय होता?

तक्रारदार हे मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी करत असून, अधिक पगारासाठी ते विदेशात नोकरीच्या शोधात होते. त्यांना मालाड एस.व्ही. रोड येथील 'एचएन ओव्हरसीस' या एजन्सीबाबत माहिती मिळाली. संबंधित एजन्सीने त्यांना लेक्झमबर्गमधील ‘सॉफीटेल हॉटेल’मध्ये नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन दिलं.

त्यानुसार, तक्रारदाराने प्रोसेसिंग फी आणि कमिशन म्हणून ४ लाख रुपये अदा केले. पुढील सहा महिन्यांत कोणतीही नोकरी मिळाली नाही, उलट व्हॉट्सअप व ईमेलवर बनावट बारेशर, एमओयू, टेपस्री रेसीडेंट व्हिसा अशी कागदपत्रं पाठवून त्यांच्या विश्वासाला तडा दिला गेला. त्यानंतर आरोपींनी पुन्हा १.८० लाख रुपये घेतले. तक्रारदाराने थेट लेक्झमबर्गमधील सॉफीटेल हॉटेलमध्ये संपर्क साधल्यानंतर अशा नोकरीची कोणतीही संधी अस्तित्वात नसल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर तक्रारदाराने मालाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आरोपींवर गुन्हा दाखल

मालाड पोलिसांनी 316(2), 319(2), 318(4), 336(2), 338, 340(2), 61(2), आणि 3(5) बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिस तपासात आतापर्यंत शंभरहून अधिक तरुणांकडून प्रत्येकी चार लाख रुपये घेऊन कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.