शुभम देशमुख
भंडारा : नोकरी मिळविण्यासाठी कोण काय करेल हे सांगणे कठीणच आहे. असाच प्रकार भंडारा जिल्ह्यात समोर आला आहे. अंगणवाडी सेविकेची नोकरी मिळविण्यासाठी लाभार्थी महिलेने चक्क बनावट गुणपत्रिका तयार करण्याचे काम केले. या गुणपत्रिकेच्या सुधारावी महिलेने नोकरी मिळविली असून या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारीनंतर आता या प्रकरणाची चौकशी होणार आहे.
ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी व पोषक आहार मिळावा यासाठी अंगणवाडी चालविण्यात येतात. या अंगणवाड्यांमध्ये काम करण्यासाठी दहावी किंवा बारावी पास महिलांना सेविका म्हणून भरती करून घेतले जात असते. त्यानुसार भंडारा जिल्ह्यात ज्या अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका नाही; अशा अंगणवाडीमध्ये नवीन सेविका भरती घेण्यात आली. मात्र जिल्ह्यात भरती होण्यासाठी बनवाबनवी केल्याचे समोर आले आहे.
बारावीची बनावट गुणपत्रिका
जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील निलज येथे देखील अंगणवाडी सेविका करीता भरती घेतली गेली. गावातील शिक्षित महिला, मुलींनी भरती करीता अर्ज केला. पण यात प्रेरणा वर्मा (वडीला घरच नाव) या महिलेने देखील अर्ज केला. त्यात शैक्षणिक पात्रतेवर गुण असल्याने चक्क प्रेरणा हिने १२ वर्गाची गुणपत्रिका बनावट तयार केली. या गुणपत्रिकेच्या आधारे अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी देखील मिळविली होती.
गावातील महिलेच्या तक्रारीने प्रकार उघड
मात्र गावातील स्नेहा तितिरमारे या महिलेचा संशय आल्याने तिने ऑनलाईन गुणपत्रिका काढली असता त्यात तफावत आढळून आली आहे. बनावट गुणपत्रिकामध्ये ७१.८५ टक्के आहेत. पण प्रत्येक्षात ५६.७७ टक्के असल्याचे दिसुन आले. आता या संदर्भात महिला बालकल्याण विभागाला तक्रार करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या संगमाने भरती करण्यात आली असल्याचं आरोप तक्रारदार यांनी केलं आहे. याची संपूर्ण चौकशी करण्यात येणार आहे.