कचरा उचलला पण दुर्गंधी कायम
esakal May 16, 2025 08:45 PM

पिंपरी, ता. १६ ः पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) निगडी ते दापोडी बीआरटी स्थानकांतील कचराकुंड्यामधील कचरा पालिकेकडून संकलन केला जात असला तरी अजूनही ही स्थानके स्वच्छ केली जात नसल्यामुळे अजूनही दुर्गंधी येत आहे. त्यामुळे प्रवाशांना बीआरटीत स्थानकात उभे राहणे देखील कठीण होते.
प्रवाशांना जलद प्रवास करता यावा, यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मोठा खर्च करून पीएमपीएमएल बससाठी स्वतंत्र बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) मार्गिका बांधण्यात आली. शहरात निगडी ते दापोडी, सांगवी फाटा ते किवळे, नाशिक फाटा ते वाकड आणि चिखली ते जगताप डेअरी स्पाइन रस्ता या मार्गांवर बीआरटी सुरू आहेत. पण यापैकी बहुतांश मार्गांवरील बीआरटी स्थानकात दुरवस्था झाली आहे. बीआरटी स्थानकाच्या आजूबाजूला कचऱ्याचे ढीग जमा झाले आहे. त्यामुळे बीआरटी स्थानकात दुर्गंधी पसरली आहे. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये २६ मार्च रोजी ‘बीआरटी स्थानकात कचऱ्याचे ढीग’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर महापालिकेच्या आरोग्य विभाग खडबडून जागे झाले असून, आता दररोज निगडी ते दापोडी बीआरटी स्थानकांमधील कचरा संकलन केले जात आहे. मात्र, बऱ्याच स्थानकात वेळोवेळी झाडू मारला जात नाही, प्रवाशांनी स्थानकात उलटी केल्यामुळे स्थानके अस्वच्छ झाले आहेत. त्यामुळे स्थानकात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे प्रवाशांना बीआरटी स्थानकात उभे राहणे देखील कठीण होत आहे. बीआरटी स्थानके स्वच्छ करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.