Latest Marathi News Updates :सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस
esakal May 16, 2025 09:45 PM
Kokan Live: सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस
  • कणकवली, वैभववाडी, ओरोस या भागामध्ये जोरदार पाऊस

  • हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात तीन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज

  • नागरिकांची उडाली तारांबळ

Solapur Live: प्रा. श्रुती वडगबाळकर आणि ह.भ.प. सूर्यकांत धोत्रे यांना संत साहित्य सेवा संघाचे प्रतिष्ठित पुरस्कार

संत साहित्य सेवा संघाने यंदाच्या वर्षीच्या प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी प्रा. डॉ. श्रुती वडगबाळकर आणि ह.भ.प. सूर्यकांत लक्ष्मण धोत्रे यांची निवड केली आहे. त्यांना मिळालेले पुरुषोत्तम आणि सांगाती पुरस्कार त्यांच्या संत साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिले जात आहेत.

संस्थेचे अध्यक्ष सु. स. देशमुख आणि कोषाध्यक्ष रमेश विश्वरूपे यांनी याबाबत माहिती दिली. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आगामी २८ तारखेला डफरीन चौकातील ज्ञान प्रबोधिनी उपासना मंदिरात सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि निरुपणकार विवेक घळसासी यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.

Solapur Live: स्पर्धा परीक्षा तयारीसाठी मोफत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन, दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

शेळगावकर्स युनिक करियर अकॅडमीने रविवारी (ता. १८) सकाळी १० वाजता सात रस्ता चौकानजीक विजापूर रस्त्यावरील बाळी ब्लॉकमध्ये स्पर्धा परीक्षेच्या तयारी मोफत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

यात युपीएससी, एमपीएससीसह बँक, एसएससी, आरआरबी, सरळ सेवा भरती, पोलिस भरती यासाठी होणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीविषयी मार्गदर्शन होणार आहे. अकॅडमीमध्ये वर्षभर स्पर्धा परीक्षाविषयक मोफत मार्गदर्शन उपलब्ध आहे.

दहावी, बारावीनंतर लगेचच तयारी सुरू केल्यास पहिल्या प्रयत्नात स्पर्धा परीक्षांत यश मिळू शकते. तसेच पदवी मिळवतानाही या परीक्षांचा अभ्यास सहज शक्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेच लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक सुनील शेळगावकर यांनी केले आहे.

Live: ऑपरेशन सिंदूरच्या यशाच्या आनंदात अकोल्यात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याचा सन्मान

ऑपरेशन सिंदूरच्या यशाच्या आनंदात अकोल्यात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याचा सन्मान

Live: केरळमध्ये तिरंगा यात्रा! केंद्रीय मंत्री सुरेश गोपींचा सशस्त्र दलांना सलाम

ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी सशस्त्र दलांचा सन्मान करत केरलमध्ये केंद्रीय राज्य मंत्री सुरेश गोपींनी त्रिशूर जिल्ह्यात तिरंगा यात्रा हरीझंडी दिली. त्यांनी म्हटले की ऑपरेशन सिंदूरने जगभरात दहशतवादाला कडक इशारा दिला आहे.

World Health Organization Live Updates: जागतिक आरोग्य संघटनेने पापुआ न्यू गिनीमध्ये पोलिओचा प्रकोप वाढत असल्याची घोषणा केली

जागतिक आरोग्य संघटनेने पापुआ न्यू गिनीमध्ये पोलिओचा प्रकोप वाढत असल्याची घोषणा केली आहे. लाय या तटीय शहरात एका स्वस्थ बालकाच्या नियमित तपासणीत अत्यंत संसर्गजन्य विषाणू आढळल्याने तत्काळ लसीकरण मोहीम राबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Rajnath Singh Bhuj Visit Live Updates: पाकिस्तानला IMFकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीवर पुनर्विचार झाला पाहिजे - रक्षणमंत्री राजनाथ सिंह

पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीवर पुनर्विचार झाला पाहिजे, कारण हा निधी दहशतवादी ढांचे उभे करण्यासाठी वापरला जाण्याची शक्यता अधिक आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

Live : बार्शी तालुक्यात तरुणावर चार जणांचा हल्ला; जीवे मारण्याची धमकी

बार्शी तालुक्यातील उक्कडगावात किरण बाबासाहेब खुरंगळे या तरुणावर चौघांनी एकत्र येऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही हल्ल्याची घटना दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून घडल्याचे समजते.

मारहाणीदरम्यान आरोपींनी जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Live : मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढतोय, राज्यातील १४ जिल्ह्यांत अधिक प्रभाव

राज्यात मान्सूनपूर्व पावसाने जोर पकडला असून, १४ जिल्ह्यांमध्ये या पावसाचा प्रभाव अधिक जाणवतोय.

आजपासून पुढील १५ दिवस म्हणजे ३१ मेपर्यंत, म्हणजेच मान्सून केरळात दाखल होईपर्यंत, मुंबईसह कोकण आणि महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये दररोज बदलत्या स्वरूपात मान्सूनपूर्व वळवाचा पाऊस अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.

या पावसात वीजांचे लखलखाट, वाऱ्याचा वेग आणि ढगांच्या गडगडाटासह धो-धो स्वरूपातील मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याचा अर्थ, हा पाऊस खरा मान्सून नाही, तर त्याच्या आगमनाआधीचा वळवाचा पाऊस आहे.

Live : सोलापूर शहरात ड्रोन उडवण्यावर तात्पुरती बंदी

सोलापूर शहरात 15 मे ते 3 जून 2025 या कालावधीत ड्रोन किंवा इतर मानवरहित यंत्रणेच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. परवानगीशिवाय ड्रोन उडवणे, छायाचित्रण करणे किंवा कोणत्याही स्वरूपात ड्रोनचा वापर करणे बेकायदेशीर ठरेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

ड्रोनच्या अनियंत्रित वापरामुळे उद्भवू शकणाऱ्या सुरक्षेच्या धोक्यांपासून बचाव करण्यासाठी आणि भविष्यात ड्रोनद्वारे होऊ शकणाऱ्या संभाव्य हल्ल्यांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला असून, उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Live : सोलापूर तालुक्यातील वडजी गावात जोरदार पाऊस

वडजी गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले

पाणी घरात शिरल्याने अनेक नागरिकांच्या गृहउपयोगी साहित्याचे नुकसान झालय

मुसळधार पावसामुळे संपूर्ण वडजी गावाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाल्याचं चित्र दिसून आलं.

वडजी ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे घरात पाणी शिरले असल्याचा आरोप ग्रामस्थ्यांनी केलाय.

Live : कर्जत इथं हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीनं'कर्जत बंद'चं आवाहन

कर्जत शहरातील प्राचीन हनुमान मंदिरा भोवतीचे अतिक्रमण काढावे यासाठी आज कर्जत बंद आणि रस्ता रोको आंदोलन...

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन सुरू ..

Live : पुणे महापालिका आयुक्त करणार पालखी मार्गाची पाहणी

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले येत्या सोमवारी करणार आहेत

पुढील महिन्यात दोन्ही पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत

दरम्यान दोन्ही पालख्या पुणे शहरात मुक्कामी असणार आहे

त्यामुळे शहरातील सोयी सुविधा यासह पालखी मार्ग याची पाहणी पालिका आयुक्त यांच्यासह इतर अधिकारी सुद्धा उपस्थित असणार आहेत.

Pune Live : पुणे महापालिका आयुक्त करणार पालखी मार्गाची पाहणी

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी पुण्याचे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले येत्या सोमवारी करणार आहेत. पुढील महिन्यात दोन्ही पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. दरम्यान, दोन्ही पालख्या पुणे शहरात मुक्कामी असणार आहेत. त्यामुळं शहरातील सोयी सुविधा यांसह पालखी मार्गाची पाहणी करताना पालिका आयुक्त यांच्यासह इतर अधिकारी सुद्धा उपस्थित असणार आहेत.

Nagpur Live : अंबाझरीत डोक्यावर लाकडाची फळी पडल्यानं वृद्धांचा मृत्यू

नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाणे अंतर्गत घडलेल्या एका घटनेमध्ये डोक्यावर लाकडाची फळी पडल्यानं एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी एका मजुरावर सदोष मनुष्यबदाचा गुन्हा नोंदवला आहे. सुखदेव बळीराम आसवले असं मृताचं नाव आहे. तर सागर प्रेमचंद पाटील असं आरोपी मजुराचं नाव आहे. मजूर सागर हा बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून लाकडाच्या फळ्या खाली फेकत होता. त्यांनी खाली न पाहताच बेजबाबदारपणे एक फळी खाली फेकली आणि ती फळी सुखदेव यांच्या डोक्यावर पडली. यामुळं त्यांचं डोकं फुटलं आणि ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Mumbai Live : परदेशात नोकरीच्या आमिषाने शंभरहून अधिक तरुणांची फसवणूक, लावला कोट्यावधींचा चुना

शेकडो तरुणांना परदेशात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून शंभरहून अधिक तरुणांची आर्थिक फसवणूक करणार्या तीन जणांविरोधात मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी मालाड येथे एचन ओवरसीस या नावाने कार्यालय थाटून विदेशात पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी लावण्यासाठी बेरोजगार तरुण तरुणांकडून प्रत्येकी 4 लाख रुपये घेतले. आरोपींनी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या तरुणांना व्हाट्सअपवर बनावट बारेशर, एमओयु, टेपस्री रेसीडेंट विझा, व इतर कागदपत्रे पाठवुन तरुणांकडून पैसे गोळा करून तरुणांना करोडोंचा चुना लावला. याप्रकरणी मालाड पोलिसांनी अमन कमलमिया शेख, जिग्नेशकुमार राठवा व एकता अहिरे उर्फ दृष्टी उर्फ मनिषा यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच तीनही आरोपी फरार झाले असून मालाड पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहे.

Live : लाडकी बहीण योजनेतील 'या' महिलांच्या अर्जांची तपासणी होणार नाही

पिवळे व केशऱी रेशनकार्डधारक असलेल्या महिलांच्या अर्जांची तपासणी होणार नाही, असा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे.

LIVE : “संजय राऊत वाट्टेल तशी फालतू बडबड करतात'', पुस्तकातील दाव्यानंतर भाजपाचं प्रत्युत्तर

महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकातील दाव्यांवर तीव्र टीका केली आहे. राऊतांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी संकटातून बाहेर काढल्याचा दावा केला होता. यावर महाजन म्हणाले, “संजय राऊत यांच्या बद्दल काय बोलावं? ते वाटेल तशी फालतू बडबड करतात. आता त्यांना कोणी ऐकत नाही, कोणी गांभीर्याने घेत नाही.” असं ते म्हणाले.

Yavatmal Live : यवतमाळमध्ये अवकाळी पाऊस, शेतकपिकांचं मोठं नुकसान

यवतमाळ जिल्ह्यात रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी भुईमूग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दारव्हा तालुक्यात बोथ, बिजोरा, दत्तापूर, मांगकिन्ही,हातणी या गावातील शेतकऱ्यांनी

उन्हाळी भुईमुगाची लागवड केली होती. मात्र जिल्ह्यात काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतामध्ये काढून ठेवलेला या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

Live : खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाच्या पथकाची मोठी कारवाई

वाशी तालुक्यातील पिंपळगाव लिंगी येथे विनापरवाना व अवैध,अनाधिकृत पणे साठवुन ठेवलेला ४५७ बॅग २० मेट्रिक टन खतसाठा जप्त करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय व तालुका स्तरीय भरारी पथकाने संयुक्त कारवाई केली आहे. दोघांविरुद्ध वाशी पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

Live : अवकाळी पावसामुळे रायगडमध्ये आंबा पीक धोक्यात

रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

पुढे अजून दोन दिवस कोकण किनारपट्टीवरील अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

सध्या कोकणात शेवटच्या टप्प्यातील आंब्याचा हंगाम सुरू झाला असून या अवकाळी पावसाचा फटका शेवटच्या टप्प्यातील आंबा उत्पादनाला बसतो आहे.

Mumbai Live: परदेशात नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक; मालाडमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल

मालाडमध्ये परदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून शंभरहून अधिक बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एचन ओवरसीस नावाने कार्यालय थाटून आरोपींनी प्रत्येकी चार लाख रुपये उकळले. बनावट कागदपत्रे, व्हॉट्सअॅपवर पाठवलेले फसवे ऑफर लेटर आणि व्हिसा डॉक्युमेंट्स वापरून त्यांनी बेरोजगार तरुणांची दिशाभूल केली. अमन कमलमिया शेख, जिग्नेशकुमार राठवा आणि एकता अहिरे उर्फ दृष्टी उर्फ मनिषा अशी या आरोपींची नावे असून गुन्हा नोंदवताच ते तिघेही फरार झाले आहेत. सध्या मालाड पोलीस त्यांचा शोध घेत असून हा घोटाळा कोट्यवधी रुपयांचा असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

China Earthquake : चीनमध्ये ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

भारतीय वेळेनुसार, आज सकाळी ६:२९ वाजता चीनमध्ये ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली.

Karnataka News : कर्नाटकातील सात अधिकाऱ्यांच्या ४० ठिकाणांवर लोकायुक्तांचे छापे

बंगळूर : सात सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी लोकायुक्त पोलिसांनी राज्यातील विविध भागांत छापे टाकले. अधिकाऱ्यांनी बंगळूरमध्ये १२, तुमकूरमध्ये ७, बंगळूर ग्रामीणमध्ये ८, यादगीरमध्ये ५, मंगळूरमध्ये ४ आणि विजयपूरमध्ये ४ आदी ४० ठिकाणांवर छापे टाकले आणि रोख रक्कम, सोने, चांदीचे दागिने, वाहने, घरे आणि जमिनीच्या नोंदींसह कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता जप्त केली.

Almatti Dam : 'आलमट्टी' उंचीप्रश्नी आज निर्धार बैठक, अंकली फाटा येथे रविवारी रास्ता रोको आंदोलन

सांगली : आलमट्टी धरणाची उंची, सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात येणारा महापूर या अनुषंगाने आज (ता. १६) येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था पदाधिकारी यांची बैठक होत आहे. आमदार अरुण लाड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत येत्या रविवारी (ता. १८) अंकली फाटा येथे होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनाचे नियोजनही करण्यात येणार आहे. ही माहिती कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी दिली आहे.

Ratnagiri Weather Update : रत्नागिरी जिल्ह्यात तीन दिवस यलो अलर्ट जारी

रत्नागिरी : जिल्ह्यात वळवाच्या पावसाचा जोर १८ मेपर्यंत राहील, असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे. त्यामुळे सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने या कालावधीत यलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वीजाही चमकण्याची शक्यता आहे.

Pune News पुण्याच्या कात्रज चौकात लाकडी दांडा घेऊन एकमेकांना मारहाण; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पुण्याच्या कात्रज चौकामध्ये लाकडी दांडा घेऊन एकमेकांना मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काल दुपारी ही मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे.

Waqf Act : 'वक्फ'वरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने २० मे'पर्यंत टाकली लांबणीवर

नवी दिल्ली : सुधारित वक्फ कायद्याला आव्हान देत दाखल झालेल्या याचिकांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने २० मेपर्यंत लांबणीवर टाकली आहे. याबाबतच्या आक्षेपांवर सरकारकडून उत्तरादाखल करण्यात आले असल्याची माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्या. ऑगस्टीन मसीह यांच्या खंडपीठाला दिले. ‘‘हे प्रकरण प्रलंबित आहे तोवर आधी दिलेल्या निर्देशानुसार ‘जैसे थे’ स्थिती ठेवली जावी,’ असे गवई यांच्याकडून सांगण्यात आले.

Weather Update LIVE : मॉन्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मे पर्यंत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता!

पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) गुरुवारी अरबी समुद्रात दाखल झाले आहेत. मालदीवच्या काही भागासह श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत मॉन्सूनने प्रगती केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. अंदमान बेटे आणि बंगालच्या उपसागरातही मॉन्सूनने चाल केली आहे. मॉन्सूनचा प्रवास वेगाने होत असून, २७ मेपर्यंत तो केरळमध्ये पोहोचण्याची चिन्हे आहेत.  

ISRO LIVE : 'इस्रो' येत्या रविवारी अवकाशात सोडणार १०१ वा उपग्रह

चेन्नई : भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ येत्या रविवारी (ता. १८) देशाचा १०१ वा उपग्रह अवकाशात सोडणार असल्याची माहिती या संस्थेचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी दिली. ‘‘आम्ही जानेवारीमध्ये श्रीहरीकोटा येथून शंभरावा उपग्रह अवकाशात सोडला होता. आता भूनिरीक्षण उपग्रह ‘रिसॅट-१८’ हा १०१ वा उपग्रह ‘पीएसएलव्ही सी-६१’ या प्रक्षेपकाद्वारे १८ मे रोजी सोडला जाणार आहे,’ असे नारायणन यांनी जाहीर केले.

Donald Trump LIVE : आयफोन भारतात नेऊ नका, अमेरिकेत गुंतवणूक करा; अध्यक्ष ट्रम्प यांचा कंपनीचे सीईओ टीम कूक यांच्यावर दबाव

Latest Marathi Live Updates 16 May 2025 : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) गुरुवारी अरबी समुद्रात दाखल झाले आहेत. मालदीवच्या काही भागासह श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत मॉन्सूनने प्रगती केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. अंदमान बेटे आणि बंगालच्या उपसागरातही मॉन्सूनने चाल केली आहे. मॉन्सून २७ मे पर्यंत केरळमध्ये पोहोचण्याची चिन्हे आहेत. तसेच ‘आयफोनचे उत्पादन अमेरिकेतच केले जावे त्याला भारतामध्ये नेऊ नका, ॲपलची उत्पादने तिथे तयार व्हावीत असे मला वाटत नाही. भारत स्वतःची काळजी घेण्यासाठी सक्षम आहे,’ असे सांगत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अॅपल’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टीम कूक यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. आलमट्टी धरणाची उंची, सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात येणारा महापूर या अनुषंगाने आज सांगलीत सर्वपक्षीय कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था पदाधिकारी यांची बैठक होत आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ येत्या रविवारी (ता. १८) देशाचा १०१ वा उपग्रह अवकाशात सोडणार असल्याची माहिती या संस्थेचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी दिली. माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे आता नव्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. ‘नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी’ दिल्लीकडून (एनएलयू) त्यांची सन्माननीय प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुधारित वक्फ कायद्याला आव्हान देत दाखल झालेल्या याचिकांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने २० मेपर्यंत लांबणीवर टाकली आहे. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.