अमेरिकेचे माजी एफबीआय संचालक जेम्स कोमी इंन्स्टाग्रामवरील एका पोस्टमुळे चांगलेच वादात सापडले आहेत. त्यांनी आपल्या इंन्स्टावर पोस्ट करताना समुद्रकिनाऱ्यावर पडलेल्या काही शंखांचा फोटो शेअर केला होता, मात्र त्यातून 8647 चा आकडा प्रतित होत होता. मला बीचवर हे अश्चर्यकारक शिंपले सापडले असं त्यांनी आपल्या फोटोला कॅप्शन दिलं होतं. मात्र दुसरीकडे ही पोस्ट ट्रम्प समर्थकांना धोक्याची घंटी वाटली, त्यामुळे या पोस्टवरून चांगलाच वाद निर्माण झाला.
अमेरिकेमध्ये 86 या आकड्याचा अर्थ एखाद्याला काढून टाकणे किंवा मारणे असा होतो, तर 47 या आकड्याचा अर्थ ट्रम्प समर्थकांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी जोडला. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यामुळे 8647 याचा अर्थ डोनाल्ड ट्रम्प यांना मरून टाका असा त्याचा गुप्त अर्थ होत असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प समर्थकांकडून करण्यात आला. त्यामुळे जेम्स कोमी हे चांगलेच वादात सापडले, विरोध प्रचंड वाढल्यानं अखेर त्यांनी आपली ही पोस्ट डिलिट केली. माझा असा कोणताही उद्देश नव्हता आणि लोक या पोस्टचा असा अर्थ काढतील असं मला कधीही वाटलंही नाही असं कोमी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यापूर्वी देखील दोनदा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे, यामध्ये त्यांच्या कानाला जखम झाली होती.डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एका अफगाण नागरिकावर खटला दाखल करण्यात आला होता, हा व्यक्ती इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डचा एजंट असून, ट्रम्प आणि इतर काही हाईप्रोफाईल लोकांना संपवणे हाच या व्यक्तीचा उद्देश असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.
इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डने सप्टेंबर 2024 ला या अफगाणी नागरिकावर ट्रम्प यांच्या हत्येची जबाबदारी सोपवल्याचा आरोप देखील अमेरिकेकडून करण्यात आला होता, ट्रम्पच नाही तर इतरही काही लोकांच्या हत्येचा कट होता, अशी माहिती उघड झाल्याचा दावा देखील अमेरिकेकडून करण्यात आला होता, यामध्ये इराणावर टीका करणाऱ्या एका पत्रकाराचा देखील समावेश होता, मात्र इराणने हे आरोप फेटाळून लावले आहेत.