भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यात कसोटी लागणार यात काही शंका नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी निवृत्ती घेतल्याने खळबळ उडाली आहे. कारण बीसीसीआयपुढे नव्याने संघ बांधणीचं आव्हान आहे. कर्णधारापासून संपूर्ण संघ बांधण्यासाठी बीसीसीआयसाठी निवड समिती खलबतं करत आहे. दोन दिग्गज खेळाडूंची जागा भरून काढणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेवर परिणाम होणार आहे. सुरुवातीपासून विजयी टक्केवारी मजबूत ठेवायची असेल तर या मालिकेत कमाल करावी लागणार आहे. दरम्यान, टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी रोहित शर्माबाबत भाष्य केलं आहे. या विधानातून त्यांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधल्याचं बोललं जात आहे.
रोहित शर्माने 7 मे रोजी इंस्टाग्रामवर पोस्ट करून निवृत्तीची घोषणा केली होती. म्हणजेच रोहित शर्माचा शेवटचा कसोटी सामना मेलबर्नमद्ये झाला होता. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. सिडनीमध्ये खेळलेल्या कसोटीत रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. ब्रॉडकास्टरशी बोलताना रोहितने स्पष्ट केलं होतं की, तो स्वत:हून या सामन्यातून बाहेर बसण्याचा निर्णय घेतला आहे. आता मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी त्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
रवि शास्त्री यांनी आयसीसी रिव्ह्यू शोमध्ये खुलासा केला की, काही दिवसांपूर्वी मुंबईत रोहित शर्मासोबत चर्चा झाली होती. तेव्हा सिडनी कसोटीबाबत त्याच्याशी बोललो. असं सांगत रवि शास्त्री पुढे म्हणाले की, ‘कदाचित मी रोहित शर्माला सांगितलं होतं की, जर मी कोच असतो तर तो सामना खेळणार नाही असं झालं नसतं.तो शेवटचा कसोटी सामनाही खेळू शकला असता. कारण मालिका धोक्यात होती.’ रवि शास्त्री यांनी अप्रत्यक्षरित्या गौतम गंभीरवर निशाणा साधला आहे.
‘लगेच हार पत्कारण्यापैकी मी नाही. जेव्हा मालिका 2-1 अशी होती तेव्हा संघाला सोडून जावं. तो सामना असा होता की त्यात 30-40 धावा खूप होत्या.’ असं रवि शास्त्री पुढे म्हणाले. सामन्यानंतर रोहितने स्पष्ट केलं होतं की या फॉर्मेटमध्ये खेळत राहणार आहे. फक्त एका सामन्यासाठी बाहेर बसलो होतो. पण पाच महिन्यातच त्याने निवृत्ती जाहीर केली.