- गौतमी देशपांडे आणि नेहा दीक्षित
कधीमधी आपल्याला काही लोक अचानक भेटतात आणि ते आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून जातात. असंच काहीसं गौतमी आणि नेहा यांचंही. इंजिनिअरिंग कॉलेजच्या पहिल्याच दिवशी दोघींची भेट झाली, आणि एका साध्या ओळखीचं रूपांतर घट्ट मैत्रीत झालं. कॉलेजच्या बाकावर सुरू झालेली ही गोष्ट आता आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देणाऱ्या मैत्रीमध्ये बदलली आहे.
गौतमी सांगते, ‘आमच्या मैत्रीची सुरुवात व्हीआयटी कॉलेजमधूनच झाली. इंजिनिअरिंगचा पहिलाच दिवस होता. वर्गात गेले तर सगळेजण अनोळखी होते. मला नेहा एकटीच बसलेली दिसली. तिच्याकडे बघूनच जाणवलं, की हिच्याशी आपली मैत्री होऊ शकते. मी तिला विचारलं, ‘मी तुझ्या शेजारी बसू का?’ ती हसून ‘हो’ म्हणाली आणि तिथूनच आमचं बोलणं सुरू झालं, आणि त्या क्षणापासून आमची मैत्री सुरू झाली.’
ती सांगत होती, ‘नेहाविषयी बोलायचं झालं तर, ती अतिशय सॉर्टेड आहे. कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर आधी सगळं व्यवस्थित प्लॅनिंग करते. ती खूप हार्डवर्किंग आहे. अगदी वर्कआउटसुद्धा तिच्या डेली रूटिनचा प्लॅनचा भाग असतो. सगळ्यात छान म्हणजे ती तिच्या मित्रमैत्रिणींसाठी काहीही करायला तयार असते.’
एकमेकींत थोडा विरोधाभास असला, तरी मी जरा एक्स्ट्रोव्हर्ट आहे, तर ती थोडीशी इन्ट्रोव्हर्ट; पण खरं सांगायचं तर मला तिचं हे इन्ट्रोव्हर्ट असणंही आवडतं. मात्र, ती कधी कधी खूप ओव्हरथिंकिंग करते. खरं तर आम्ही दोघीही अतिविचार करतो.
मग दोघी एकमेकींना समजावत बसतो, की आता बस, अतिविचार नको. तिच्याकडून शिकण्यासारखं म्हणजे तिचं सगळं नीट नियोजनात असणं. काहीही असो, ती आधी विचार करून पूर्ण प्लॅनिंग करते, त्यामुळे ती सतत सॉर्टेड असते.’
दुसरीकडे, नेहा म्हणते, ‘आमची मैत्री इंजिनिअरिंगपासून सुरू झाली. गौतमी म्हणजे मेहनती मुलगी. ती कधी कटकट करत नाही. कितीही काम असू दे, ती नेहमी हसत आणि एनर्जीनं काम करत असते. तिच्याकडून शिकण्यासारखी हीच गोष्ट आहे.’
‘पण एक गोष्ट मात्र सांगावीच लागेल...’ नेहा खट्याळपणे म्हणते, ‘ती कायम म्हणते, ‘आपण भेटूया, भेटूया’; पण प्रत्यक्ष भेटायचं काही जमत नाही!’
गौतमी हसून आठवते, ‘एखादी आठवण सांगायची, तर एक निवडणं कठीण आहे, कारण सगळे क्षणच खास आहेत; पण तिचं लग्न - लॉकडाऊनमध्ये - फारच जवळचा क्षण होता. फक्त २५ लोक होते, आणि मी तिची करवली होते. तिला नटवण्यापासून ते तिचं लग्न लागेपर्यंत मी तिच्यासोबत होते. ती एक वेगळीच भावना होती. तिनं तिच्या त्या खास दिवसासाठी मलाच सोबत ठेवलं, ही गोष्ट आयुष्यभर लक्षात राहील.’
मैत्री म्हणजे काय? यावर गौतमी विचारपूर्वक म्हणते, ‘मित्र बरोबर असो किंवा चुकतोय असं वाटो, तरी त्याच्या पाठीशी उभं राहणं, हीच खरी मैत्री. कितीही वर्षांनी भेटलो तरी, संवाद तिथून सुरू व्हावा जिथून थांबला होता, हेच मैत्रीचं खरं रूप. आज मी भारतात असते आणि नेहा लंडनमध्ये; पण आमच्यातला दुरावा कधी जाणवतच नाही.’
(शब्दांकन : मयूरी गावडे)