वैभववाडी : सावंतवाडी, कणकवली आणि दोडामार्ग तालुक्याला आज मुसळधार पावसाने अक्षरक्षः झोडपून काढले. वैभववाडी आणि देवगड तालुक्याच्या काही भागात देखील पावसाच्या (Sindhudurg Rain Update) सरी कोसळल्या. पावसामुळे सर्वाचीच तारांबळ उडाली. या पावसानंतर जिल्ह्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले असून याचा अंतिम टप्प्यातील आंबा पिकावर परिणाम होणार आहे.
(Monsoon) गुरुवारी (ता. १५) अरबी समुद्रात दाखल झाला. एकीकडे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची प्रगती वेगाने होत असून २७ मेपर्यत मॉन्सून केरळात पोहोचण्याचे संकेत आहेत; मात्र सिंधुदुर्गात सध्या मॉन्सूनसदृश वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात आठ मेपासून पाऊस सुरू आहे. जिल्ह्याच्या कोणत्या ना कोणत्या भागात पाऊस पडत आहे. सुरुवातीला वैभववाडी आणि कणकवली तालुक्यात पाऊस झाला. त्यानंतर गुरुवारी दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पाऊस झाला.
या तालुक्यातील अनेक गावांना गुरुवारी पावसाने झोडपून काढले. कणकवली आणि वैभववाडी तालुक्यात देखील पाऊस झाला होता. मात्र, आतापर्यत दुपारनंतर पडणारा पाऊस आज अनेक भागात पहाटेपासूनच सुरू झाला. तळेरे, खारेपाटण, वैभववाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये ढगांच्या हलक्या गडगडाटांसह पावसाच्या सरींना पहाटेच सुरूवात झाली. सावंतवाडी तालुक्यात आज पहिल्यांदाच मुसळधार पाऊस झाला. तालुक्याच्या अनेक भागात तासभर तो कोसळला.
अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. दोडामार्ग आणि कणकवली तालुक्याला देखील पावसाने चांगलेच झोडपून काढले. कणकवली तालुक्याच्या अनेक भागात अर्धा तास पाऊस झाला. पावसामुळे पूर्वपट्ट्यातील आंबा हंगाम संपुष्टात आला असून आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
उत्सवांमध्ये व्यत्ययजिल्ह्यात सध्या विवाह समारंभ, सत्यनारायण पूजा, वास्तुशांती, होमहवन असे विविध कार्यक्रम सुरू आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. ऐन मेमध्ये जूनप्रमाणे पाऊस कोसळत असल्याने या कार्यक्रमामध्ये व्यत्यय येत आहे.
यलो अलर्ट मंगळवारपर्यतजिल्ह्यात गेल्या सात ते आठ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने यापूर्वी १७ मे पर्यत यलो अलर्ट दिला होता. परंतु; आज पुन्हा २० मे पर्यंत यलो अलर्ट दिला आहे. या कालावधीत जिल्ह्यात वादळीवारे आणि विजांच्या लखलखाटांसह पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, २७ मेपर्यंत केरळात मॉन्सून दाखल झाल्यास ३ ते ४ जूनपर्यत सिंधुदुर्गात तो दाखल होण्याची शक्यता आहे.
मॉन्सूनसदृश वातावरणकिनारपट्टी वगळता उर्वरित जिल्ह्याच्या बहुतांशी भागात आज सर्वत्र पाऊस झाला. सकाळपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू होती. काही भागात मुसळधार पाऊस झाला. या पावसानंतर जिल्ह्यात मॉन्सूनसदृश वातावरण निर्माण झाले होते.