आयपीएल 2024 स्पर्धा भारत पाकिस्तान तणाव निवळल्यानंतर 17 मे पासून सुरु होणार आहे. या स्पर्धेच्या उत्तरार्धातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. हा सामना बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे. प्लेऑपच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. पण कोलकात्यासाठी तर करो या मरोची लढाई आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी विजयासाठी कंबर कसली आहे. पण असं असताना बीसीसीआयच्या एका निर्णयाने वादाला फोडणी मिळाली आहे. कोलकात्याचे क्रिकेट चाहत्यांनी बीसीसीआयच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी शुक्रवारी ईडन गार्डनवर बाहेर आंदोलन केलं. त्याचं झालं असं की आयपीएल 2025 स्पर्धेचा अंतिम सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर होणार होता. पण हा सामना नव्या वेळपत्रकानुसार दुसऱ्या ठिकाणी होणार असल्याची चर्चा आहे. अंतिम सामना कोलकात्यात होणार नाही असंच बोललं जात आहे. त्यामुळे क्रिकेट चाहते नाराज झाले आहेत.
कोलकात्यातील क्रीडा रसिकांचं म्हणणं आहे की, हा सामना याआधी जिथे ठरवला होता तिथेच झाला पाहीजे. आंदोलनकर्त्यांनी बीसीसीआयला कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करण्यास सांगितलं आहे. आंदोलनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. दरम्यान, अंतिम सामना यापूर्वी 25 मे रोजी होणार होता. आता नव्या वेळापत्रकानुसार हा सामना 3 जूनला होणार आहे. आता हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी स्टेडियम क्वालिफायर 2 आणि अंतिम सामन्यासाठी निवडलं गेलं आहे. हे दोन्ही सामने 1 आणि 3 जूनला होणार आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण स्थितीमुळे पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामना अर्धवट स्थितीत थांबवण्यात आला होता. आता हा सामनाही पुन्हा नव्याने होणार आहे. 24 मे रोजी हा सामना होणार आहे. दरम्यान, बीसीसीआयने प्लेऑफ आणि अंतिम फेरीसाठी अजूनही ठिकाणं जाहीर केलेली नाहीत. त्यामुळे आता बीसीसीआय काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहे.