भारतीय क्रिकेट संघ जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील ही पहिलीच मालिका असणार आहे. टीम इंडिया नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा होणं बाकी आहे. मात्र या मालिकेनिमित्ताने टीम इंडियाची या दौऱ्यात खऱ्या अर्थाने ‘कसोटी’ असणार आहे. टीम इंडियाला या मालिकेत कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी इंग्लंड दौऱ्याआधी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या 2 अनुभवी आजी-माजी कर्णधारांनी तडकाफडकी निवृत्ती घेतली. त्यामुळे भारताच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. त्यामुळे आता नव्या खेळाडूंसाठी मोठ्या प्रमाणात या दौऱ्यात आव्हान असणार आहेत.
रोहित आणि विराटच्या निवृत्तीनंतर सर्वात मोठा बदल हा बॅटिंग ऑर्डरमध्ये पाहायला मिळणार आहे. रोहित निवृत्तीआधी ओपनिंगला तर विराट चौथ्या स्थानी यायचा. आता या दोघांनंतर पहिल्या आणि चौथ्या स्थानी बॅटिंग करणं नव्या फलंदाजासाठी आव्हानात्मक असणार आहे. विराटने एक दशकापेक्षा अधिक काळ मधल्या फळीची यशस्वीपणे धुरा सांभाळली होती. तसेच रोहितनेही आश्वासक सुरुवात करुन दिली होती. आता या दोघांच्या जागी कुणाला संधी मिळणार? तसेच ते फलंदाज या दिग्गजांची जागा घेण्यात किती यशस्वी ठरणार? हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडियाच्या फलंदाजांना इंग्लंडमधील थंड हवामानात स्विंगचा सामना करावा लागणार आहे. स्विंगचा सामना करणं युवा खेळाडूंसाठी आव्हानात्मक असणार आहे. इंग्लंडमध्ये टेस्ट क्रिकेटसाठी ड्यूक बॉल वापरला जातो. ड्यूक बॉल जास्त स्विंग होतो. हवेत स्विंग केल्यानंतर सीममधूनही स्विंग मिळतो. त्यामुळे टीम इंडियाचे फलंदाज स्विंग खेळण्यासाठी काय रणनितीने मैदानात उतरतात? हे सामन्यांदरम्यानच स्पष्ट होईल.
रोहित शर्मानंतर आता कसोटी संघाचा कर्णधार कोण असणार? हा देखील मोठा प्रश्न आहे. कसोटी कर्णधारपदासाठी शुबमन गिल याचं नाव आघाडीवर आहे. मात्र ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह हे दोघेही दावेदार आहेत. टीम इंडियाचा जो कुणीही कॅप्टन असेल, त्याच्यावर दुहेरी जबाबदारी असणार आहे. खेळाडू आणि कर्णधार अशा या दोन्ही भूमिकांना न्याय देण्याचं आव्हान त्या कर्णधारावर असणार आहे.
यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह गेल्या अनेक वर्षांपासून गोलंदाजांचं नेतृत्व करतोय. बुमराहकडून चाहत्यांना इंग्लंड दौऱ्यावर अनेक अपेक्षा असणार आहे. मात्र या मॅचविनर बॉलरच्या वर्कलोड मॅनेजमेंटकडे लक्ष द्यावं लागणार आहे. बुमराह ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पाचही सामन्यात खेळला. मात्र त्यानंतर बुमराहला दुखापतीमुळे अनेक महिने क्रिकेटपासून दूर रहावं लागलं. आगामी मालिका पाहता बुमराहला पाचही सामन्यांमध्ये खेळवणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे वर्कलोडनुसार बुमराहसारखा मॅचविनर गोलंदाज निवडण्याचं आव्हान निवड समितीसमोर असणार आहे.
आयपीएलचा 18 वा मोसम संपल्यानंतर भारतीय खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे खेळाडूंसमोर स्वत:ला फॉर्मेटनुसार आणि परिस्थितीनुसार खेळण्याचं आव्हान असणार आहे. तसेच टीममधील अनेक खेळाडूंचा हा पहिलाच इंग्लंड दौरा असणार आहे. त्यामुळे चांगली कामगिरी करण्यासह पहिलाच इंग्लंड दौरा या आव्हानाचा हे युवा खेळाडू कसे सामना करतात? याकडेही चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
आतापर्यंत टीम इंडियासह रोहित शर्मा आणि विराट कोहली हे अनुभवी खेळाडू होते. त्यामुळे अडचणीत या खेळाडूंच्या अनुभवाचा फायदा टीमला पर्यायाने युवा खेळाडूंनाही झाला. मात्र आता हे दोघेही नाहीत. त्यात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोघांना निवड समितीने गेल्या अनेक महिन्यांपासून संधी दिलेली नाही. त्यामुळे टीम इंडियाची युवा ब्रिगेड अनुभवी खेळाडूंशिवाय इंग्लंडचा कसा सामना करते? याकडेही क्रिकेट विश्वाचं आणि चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 136 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. इंग्लंडने या 136 पैकी सर्वाधिक 51 सामने जिंकले आहेत. तर टीम इंडियाने 35 सामन्यांमध्ये पलटवार करत इंग्लंडचा धुव्वा उडवला आहे. तर 50 सामने हे अनिर्णित राहिले आहेत.
दरम्यान टीम इंडियाने गेल्या 17 वर्षांपासून इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकलेली नाही. भारतीय संघाने अखेरीस 2007 साली राहुल द्रविडच्या नेतृत्वात इंग्लंडला त्यांच्याच घरात लोळवत 3 सामन्यांची कसोटी मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली होती. त्यानंतर टीम इंडियाने 4 वेळा इंग्लंड दौरा केला. मात्र भारताला इंग्लंडवर मात करत त्यांच्याच घरात मालिका जिंकण्यात यश आलं नाही. त्यामुळे यंदा युवा ब्रिगेडने इतिहास घडवावा, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.