Sandip Singh Gill: पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती; पुणे शहरातील चांगल्या कामगिरीची दखल
esakal May 18, 2025 01:45 AM

Pune SP Sandip Singh Gill: पुणे शहर पोलिस दलात परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त म्हणून उल्लेखनीय कार्य करणारे संदीपसिंह गिल यांची पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाकडून याबाबतचा आदेश काढण्यात आला. शहरात कार्यरत असताना गिल यांनी विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात शांतता व कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी अत्यंत कौशल्याने पार पाडली.

अल्पवयीन गुन्हेगार पुनर्वसन उपक्रमात सहभाग

संदीपसिंग गिल यांनी गणेश मंडळांशी समन्वय, पोलिस दलाचे नियोजनातून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला. याशिवाय, शहराच्या मध्यवर्ती भागात वाढणाऱ्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवत गुन्हेगारांना लगाम घातला. तसंच अल्पवयीन गुन्हेगारांचे पुनर्वसन करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने उपक्रम हाती घेतले. अल्पवयीन गुन्हेगारांना सुधारण्याची संधी देत मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले.

गिल यांची पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदासाठी मागील सप्टेंबर महिन्यात शिफारस झाली होती. मात्र, तत्कालीन पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची केवळ सात महिन्यांत मुदतपूर्व बदली झाल्यामुळं त्यांनी कॅट (केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण) मध्ये याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायाधिकरणानं देशमुख यांच्या बदलीला स्थगिती दिली होती. दरम्यान, देशमुख यांची पुणे शहरात अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाल्यानंतर गिल यांची पोलिस अधीक्षकपदी वर्णी लागणार हे जवळपास निश्चित होते.

ग्रामीण भागासाठी कुशल नेतृत्वाची अपेक्षा

गिल यांच्या नियोजनबद्ध आणि प्रभावी कामकाजामुळे पुणे ग्रामीण परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण, तांत्रिक उपाययोजना, आणि नागरिकाभिमुख पोलिसिंगला अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.