आयपीएल 2025 स्पर्धेतील 58 सामन्यांचा खेळ संपल्यानंतर प्लेऑफचं गणित काही सुटलेलं नाही. पण चार संघ मात्र या स्पर्धेतून आऊट झाले आहेत. अजूनही सहा संघात प्लेऑफची चुरस आहे. 58 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने आले होते. पण पावसामुळे हा सामना काही झाला नाही. सरतेशेवटी दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. यामुळे कोलकाता नाईट रायडर्सचं मोठं नुकसान झालं. या स्पर्धेतून आऊट होणारा चौथा संघ ठरला आहे. पण प्लेऑफचा गुंता अजूनही सुटलेला नाही. अजूनही सहा संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं प्लेऑफचं गणित आता पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघावर ठरणार आहे. म्हणजेच रविवारी होणाऱ्या सामन्यात कोणाचाही पराभव झाला तर आरसीबी प्लेऑफमध्ये पात्र होणारा पहिला संघ ठरेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरने आतापर्यंत 12 सामने खेळले असून त्यापैकी 8 सामन्यात विजय, तर तीन सामन्यात पराभवाच तोंड पाहीलं. त्यापैकी एक सामना पावसामुळे रद्द झाला आणि एक गुण मिळाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पारड्यात 17 गुण असून गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.आरसीबीने प्लेऑफमध्ये पात्र होण्याच्या आपल्या शक्यता बळकट केल्या आहेत. रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्सपैकी कोणताही संघ हरला तर आरसीबी अधिकृतरित्या प्लेऑफसाठी पात्र ठरेल. गुजरात आणि पंजाब किंग्सची प्लेऑफची शक्यता अधिक आहे. तर चौथ्या स्थानासाठी जोरदार चुरस असणार आहे. मुंबई इंडियन्सला उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवणं भाग आहे.
दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाद झाला आहे. कोलकात्याचा या स्पर्धेतील फक्त एकच सामना शिल्लक आहे. हा सामना जिंकला तरी फक्त 14 गुण होतील. मात्र नेट रनरेटचं गणित काही सुटणार नाही. त्यामुळे या स्पर्धेतून बाद होणार चौथा संघ ठरला आहे. कोलकात्याने 13 सामने खेळले असून 5 सामन्यात विजय आणि सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. तर दोन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. त्यामुळे 12 गुण असून टॉप 4 मध्ये येणं काही शक्यच नाही.